लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला प्रगत राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन- प्रगत आंतरविद्याशाखीय भागीदारी संशोधन एएनआरएफ पेअर या कार्यक्रम अंतर्गत तब्बल ६ कोटी रुपयांपेक्षा अधिक संशोधन निधी मंजूर झाला आहे. विद्यापीठातील संशोधक या प्रकल्प अंतर्गत आयआयटी इंदौरच्या सहकार्याने विविध संशोधन कार्य करणार आहेत.
एएनआरएफ - पेअर कार्यक्रम अंतर्गत संशोधन प्रकल्प प्राप्त करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने संशोधन क्षेत्रात एक मोठी उपलब्धी प्राप्त केली आहे. विद्यापीठाने संशोधन निधी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंदौर यांच्या सहकार्याने मिळविला आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने सुरू केलेल्या एएनआरएफ - पेअर कार्यक्रम अंतर्गत हा संशोधन निधी मिळाला आहे. विद्यापीठ या कार्यक्रमांतर्गत स्पोक संस्थेचे कार्य पार पाडत आहे.
या कार्यक्रमांतर्गत औषधी निर्माणशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग, रसायनशास्त्र विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि मॉलिक्युलर बायोलॉजी अँड जेनेटिक इंजिनिअरिंग या विभागातील १० संशोधन प्रकल्पांना निवडण्यात आले आहे. आधुनिक साहित्याची निर्मिती, शाश्वत पर्यावरण विकास आणि ऊर्जा तंत्रज्ञान या विषयावील संशोधनासाठी हा संशोधन निधी प्राप्त झाला आहे. एएनआरएफ - पेअर कार्यक्रम अंतर्गत संशोधन प्रकल्प मंजूर झाल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची उत्कृष्ट संशोधन क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यात भर पडणार आहे.
कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी केला संशोधकांचा गौरवतब्बल सहा कोटी रुपयांचा संशोधन निधी मंजूर झाल्याने प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांनी विद्यापीठातील संशोधकांचा सन्मान केला. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, प्रभारी आयआयएल संचालक डॉ. निशिकांत राऊत, आयक्यूएसी संचालक डॉ. स्मिता आचार्य, प्रकल्प समन्वयक डॉ. दादासाहेब कोकरे, डॉ. रिता वडेतवार, डॉ. विणा बेलगमवार, डॉ. रुपेश बडेरे, डॉ. विजय तांगडे, डॉ. उमेश पलीकुंडवार, डॉ. प्रकाश ईटनकर, डॉ. प्रवीण जूगादे, डॉ. दयानंद गोगले, डॉ. प्रमोद साळवे, डॉ. राजेश उगले उपस्थित होते.