निशांत वानखेडे, नागपूरनागपूर : तीन दिवसाच्या उबदार वातावरणानंतर बुधवारी रात्रीसाेबत दिवसाचाही पारा माेठ्या फरकाने खाली घसरला. नागपूरला मंगळवारी १३.७ अंशावर असलेले किमान तापमान २४ तासात ३.५ अंशाने घसरत १०.२ अंशावर आले. पारा घसरण्यासह उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे अंगाला झाेंबणारा गारठा जाणवायला लागला आहे. विशेष म्हणजे दिवसाही किमान थंडीची जाणीव हाेत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार बुधवारी नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यात कमाल व किमान तापमान खाली घसरले. गाेंदिया येथे दिवसाचे सर्वात कमी २५.२ अंश व त्यानंतर भंडारा येथे २५.६ अंश तापमान हाेते. ९ अंश किमान तापमानासह यवतमाळ जिल्हा सर्वाधिक गारठला आहे. याशिवाय गाेंदिया ९.४ अंश, तर अमरावती व बुलढाणा ९.८ अंशावर घसरले आहेत. नागपूर, वर्ध्यात कमाल तापमान २७ अंशावर तर गडचिराेली, चंद्रपूर येथे २८ अंशावर घसरले आहे, जे सरासरीच्या खाली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात रात्रीचा पारा २४ तासात ३ ते ५ अंशाने खाली घसरला आणि सरासरीपेक्षा २ ते ४ अंशाने कमी आहे.
उत्तर भारताच्या बहुतेक राज्यात थंडीची लाट कायम आहे व डझनभर राज्यात धुके पसरले आहेत. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील बहुतेक जिल्हे थंडीच्या प्रभावात आहेत. जळगाव येथे सर्वात कमी ८.२ अंश किमान तापमानाची नाेंद झाली. थंडगार वाऱ्यामुळे गारठा अधिक तीव्रपणे जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार थंडीची ही स्थिती पुढचे दाेन-तीन दिवस राहणार आहे. त्यानंतर मात्र बदलत्या स्थितीमुळे ढगाळ वातावरण निर्माण हाेवून थंडीचा प्रभाव काहीसा कमी हाेण्याची शक्यता व्यक्त केली आहे.