नागपूर : उपराजधानीत हत्यांचे सत्र सुरूच असून एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनांत गॅंगवॉरमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली. या दोन्ही घटनांमुळे शहरातील क्राईम ग्राफचा मुद्दा परत चर्चेत आला आहे. सक्करदरा व वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. एका घटनेत प्रॉपर्टी डीलरचा दगडाने ठेचून खून करण्यात आला तर दुसऱ्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेल्या तरुणाची टोळक्याने चाकूने भोसकत हत्या केली. एकीकडे शहर पोलीस ‘टायगर मॅरेथॉन’मध्ये व्यस्त असताना दुसरीकडे गुंडांच्या दहशतीने डोके वर काढल्याचे चित्र आहे.
पहिली घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. अमोल कृष्णा वंजारी (३१,अंतुजीनगर, भांडेवाडी) असे मृतकाचे नाव आहे. १ जानेवारी रोजी अमोलने त्याचे साथीदार हर्ष नाईक, राजू नाईक, किशन तांडी, शेखर शेंद्रे, रोहीत या साथीदारांसोबत तुलसीनगर सिमेंटरोडवर जब्बार उर्फ यश प्रवीण प्रधान याच्यावर चाकूने हल्ला केला होता. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता व इतरांसोबत अमोलची तुरुंगात रवानगी झाली होती. मंगळवारी अमोल जामिनावर बाहेर आला. त्यानंतर तो बुधवारी सायंकाळी केबलच्या कामाने इतवारीत गेला. रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास जब्बारने तेजस मेंढे, लकी बल्का व इतर ३-४ साथीदारांसोबत अमोलला न्यू सूरजनगर झोपडपट्टीत गाठले व बेदम मारहाण केली. आरोपींनी मिना कुमार यांच्या झोपडीच्या दरवाजातच अमोलवर चाकूने सपासप वार केले. त्यात अमोलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी फरार झाले. मिना कुमारने अमोलच्या वडिलांना व पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. अमोलचे वडील कृष्णा वंजारी याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
गब्बरकडून इतरांचादेखील ‘गेम’ करण्याची धमकी
अमोलवर चाकूने वार केल्यानंतर गब्बर त्याच्या मृतदेहासमोर उभा झाला व तू माझ्यावर हल्ला केला म्हणून मी तुला संपविले. इतर लोक बाहेर आल्यावर त्यांनादेखील सोडणार नाही अशी धमकी त्याने दिली. सर्व आरोपींच्या हातात शस्त्र असल्याने घटनास्थळावर कुणीही त्यांना थांबविण्याचीदेखील हिंमत केली नाही.
पोलीस ठाण्यात तक्रार दिली अन तीन तासांत हत्या
दुसरी हत्या सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. अमोल उर्फ प्रदीप पंचम बहादुरे (४४, राणी भोसलेनगर) असे मृतकाचे नाव आहे. अमोलची चंद्रमणी नगराळे सोबत प्रॉपर्टी डिलिंगचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी अमोल, नगराळे व अमित भुसारी हे उमरेड येथील मटकाझरी गावात प्रॉपर्टीबाबत बोलण्यासाठी गेले होते. तेथे त्यांचा शुभम हटवार (३०) याच्याशी वाद झाला. त्या वादातून शुभमने त्याच्या १५ साथीदारांसोबत अमोलच्या जयंती नगरी, बेसा येथील कार्यालयात येऊन हातापाई करत धमकी दिली. याची तक्रार करायला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अमोल व नगराळे हे बेलतरोडी पोलीस ठाण्यात गेले. त्यानंतर शुभमने चर्चेसाठी बोलाविल्यामुळे अमोल सेवादलनगर येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ जात असल्याची माहिती अमोलने पत्नीला दिली. रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अमोल कारने तेथे पोहोचल्यावर शुभम व त्याच्या जवळपास १० साथीदारांनी हल्ला केला.
आरोपींनी अमोलवर दगडविटांनी प्रहार केले. त्यानंतर आरोपी पळून गेले. घटनास्थळावरील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अमोलला ऑटोत मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अमोलची पत्नी कल्याणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी शुभमसह अतीत, लाला, आकाश भगत, प्रवीण ढेंगे, दिनेश देविकास गायकी (४६, भांडे प्लॉट) व इतर साथीदारांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी दिनेश, प्रतीक गांडे और शुभम विंचुरकर अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अमोल हा सक्करदऱ्यातील एका टोळीशी कनेक्ट असल्याची माहिती समोर आली आहे.
पॅरोलवर आरोपी आला होता बाहेर
आरोपी दिनेश गायकी हा कुख्यात गुंड असून तो काही दिवसांअगोदर पॅरोलवर बाहेर आला होता. दिनेश व शुभम हे दोेघेही राजू भद्रेच्या टोळीशी जुळले आहेत. दिनेशला पिंटू शिर्के हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तो जमीन कब्जा करण्याच्या मागे लागला होता. त्याने शुभमसोबत मटकाझरीत मुरूम खोदण्यासाठी जमीनीचा सौदा केला होता. अमोलदेखील त्याच जमिनीच्या सौद्यात इच्छुक होता. त्यातूनच वाद झाला होता.
तर वाचला असता अमोलचा जीव
शुभमने हल्ला करत धमकी दिल्याची तक्रार अमोलने बेलतरोडी पोलीस ठाण्यात गेला होता. मात्र जमिनीच्या वादातून भांडण झाल्याचे कारण देत तक्रार फारशी गंभीरतेने घेतली नाही. जर पोलिसांनी लगेच कारवाई केली असती तर अमोलचा जीव वाचू शकला असता.