लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दोन हत्यांच्या घटनांनी नागपूर हादरले. जुन्या वादातून आरोपींनी एका तरुणाला घेरून लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोसकले. तर गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉटन मार्केटजवळ दारूच्या नशेत आरोपीने परिचित व्यक्तीचीच हत्या केली. या दोन्ही घटनांमधील आरोपींना पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.
पहिली घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कॉटन मार्केट मेट्रो स्थानकाजवळ झाली. तेथील झोपडीसमोर मृतक अमोल पैकुजी बनकर (३६) याचे श्वेतांबर उर्फ मुलूक दुर्योधन मेश्राम (४२, नेहरूनगर झोपडपट्टी, हुडकेश्वर) याच्याशी दारू पिण्याच्या कारणावरून भांडण झाले. मेश्रामने अमोलला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. मेश्रामने धक्का दिल्याने अमोल हा डोक्याच्या भारावर खाली पडला व त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. या प्रकारामुळे मेश्रामची नशा उतरली व त्याने सतिश नावाच्या ओळखीच्या व्यक्तीला अमोलला दवाखान्यात घेऊन जा असे म्हणून पैसे दिले. सतिश अमोलला मेयो इस्पितळात घेऊन गेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा प्रकार अमोलच्या घरी कळविण्यात आला. पोलिसांनी सतिशची चौकशी केली असता मेश्रामने धक्का दिल्याने अमोलचा जीव गेल्याची बाब स्पष्ट झाली. पोलिसांनी अमोलचा भाऊ अक्षय याच्या तक्रारीवरून मेश्रामविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
लकडगंजमध्ये हत्या, ठाण्यात तणावदुसरी घटना सोमवारी मध्यरात्री लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. जुन्या वादातून चार आरोपींनी हर्षल अनिल सौदागर (२६, लाल प्रायमरी शाळेजवळ, लकडगंज) याला भोसकले. त्याचा
चार तरुणांसोबत जुना वाद होता. त्याला प्रज्वल उर्फ फारूख नामदेव कानारकर (२४, टिमकी भानखेडा) ,प्रज्वल उर्फ पज्जी सुधाकर डोरले (२४, नवाबपुरा, गंगाबाई घाट मार्ग), वैभव उर्फ कंडोम हिरामन हेडाऊ (२८, गुजरी चौक, जुनी मंगळवारी) व राहुल उर्फ दद्या दशरथ शेटे (३३, गुजरी चौक, जुनी मंगळवारी) यांनी रात्री १२ वाजताच्या सुमारास गुजरी चौकात अडविले. त्यांनी जुना वाद उकरून काढत हर्षलला मारहाण केली व अचानक त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या हर्षलचा मृत्यू झाला. ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे संतापाचे वातावरण निर्माण झाले व लोकांनी लकडगंज पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. तेथे रात्री तणाव निर्माण झाला होता. हर्षलचे काका सुधीर सौदागर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.