लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील प्रगतिशील विकास कामांमुळे सध्या नागपूरच्या स्वच्छतेवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग उर्फ सतीश डागोर यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केले.
शहराच्या स्वच्छता रॅकींगमध्ये नागपूर शहर देशभरात २७ व्या क्रमांकावर राहिले आहे. याबाबत शेरसिंग डागोर यांचे मत विचारले असता त्यांनी सांगितले की, नागपूर शहर हे स्वच्छतेमध्ये माघारलेले नाही. मागच्यावर्षी सुद्धा २७ व्या क्रमांकावरच होते. मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहर खोदून ठेवले गेले आहे. अशा परिस्थितीत नियमित सफाई करणे अवघड आहे. मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर निश्चितच शहराची स्वच्छता रॅँकिंग सुधारेल.” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून स्वच्छता क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी आणि योजनांचा लाभ थेट त्यांच्या पर्यंत पोहोचावा यासाठी २२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत टिंबर मार्केट येथील पाटीदार भवन येथे भव्य लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डागोर यांनी यावेळी दिली.
शिबिराचे उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूरचे पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, माजी महापौर दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थानी राहणार आहेत. आमदार संदीप जोशी, कृष्णा खोपडे, मोहन मते आणि प्रवीण दटके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
या शिबिरात महिला सफाई कर्मचाऱ्यांना साड्यांचे वितरण, महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून २०५ सफाई कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र, तसेच गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे उपस्थित होते.