नागपूर पोलीस आयुक्तांचे ऑपरेशन क्राईम कंट्रोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 10:35 PM2020-08-01T22:35:59+5:302020-08-01T22:39:19+5:30

पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले.

Nagpur Police Commissioner's Operation Crime Control | नागपूर पोलीस आयुक्तांचे ऑपरेशन क्राईम कंट्रोल

नागपूर पोलीस आयुक्तांचे ऑपरेशन क्राईम कंट्रोल

Next
ठळक मुद्दे२४ महिन्यात २० टोळ्या पोहचविल्या कारागृहात : ११७ गुंडांवर मकोका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आपल्या नागपुरातील दोन वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा पत्रकारांसमोर सादर करून शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याबद्दल नागपूरकरांचे आभार व्यक्त केले. शहरात ऑपरेशन क्राईम कंट्रोल राबविताना कुख्यात गुन्हेगारांच्या २० टोळ्यांमधील ११७ गुन्हेगारांवर मकोका तसेच ५१ खतरनाक गुंडांवर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबले.जुलै २०१८ ला डॉ. उपाध्याय यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली होती. आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ऑपरेशन क्राईम कंट्रोल अंतर्गत विविध उपक्रम राबविले. त्यानुसार शहरातील १६, ७१२ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. ११२१ गुन्हेगारांना घातक शस्त्रासह पकडले. ऑपरेशन क्रॅकडाऊन चालवून त्यांनी शहरातील गुंडांवर नियंत्रण मिळविले. ऑपरेशन वॉश आऊटनुसार विविध ठिकाणच्या अवैध धंद्यावर छापेमारी करण्यात आली. शहरातील गुंड निवडणुकांच्या काळात कमालीचे सक्रिय होतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ठोको स्कॉड बनविला. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्राईम इंटेलिजन्स युनिट बनवून शहरातील गुन्हेगारांवर नजर ठेवली. शहरातील सडकछाप मजनूना तसेच महिला मुलींचे दागिने हिसकावून पळणारासाठी विशेष पथके तयार करुन नागपुरातील चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याना आळा घातला. नागपूरला फ्री सिटी बनविण्याचा संकल्प व्यक्त करताना त्यांनी आबू खान सारख्या ड्रग माफियाचे नेटवर्क उद्ध्वस्त केले. शहरातील २८९ तस्करांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पावणेचार कोटी रुपयांचे मादक पदार्थ जप्त केले. डॉ. उपाध्याय यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच कळत-नकळत गुन्हेगारीत अडकलेल्या अल्पवयीन मुलांसाठीही विशेष उपक्रम राबविले.

महिलांसाठी होम ड्रॉप योजना
पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी शहरातील महिला मुलींसाठी राबविलेली होम ड्रॉप योजना राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. या योजनेचे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील पोलिसांकडून कौतुक झाले. कोरोनाच्या प्रादुर्भावाची चाहूल लागताच शहर पोलीस दल रस्त्यावर आले. त्यामुळे सुरुवातीला कोरोनाचे संक्रमण रोखण्यात नागपूरला चांगले यश आले होते. आपल्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत सर्वच स्तरातील मंडळीकडून गुन्हेगारी नियंत्रणासाठी चांगले सहकार्य मिळाल्याची भावना डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लोकमत'शी बोलून दाखविली. नागरिकांच्या सहकार्यामुळेच शहरातील ३० टक्के गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळाल्याचे सांगून त्यांनी नागपूरकरांचे आभार व्यक्त केले.

Web Title: Nagpur Police Commissioner's Operation Crime Control

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.