नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी पेरला पोलीस दलात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 01:08 AM2018-10-28T01:08:23+5:302018-10-28T01:10:30+5:30

उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कर्तव्यकठोर निर्णय घेणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलात गोडवा पेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विविध पोलीस ठाण्यात कोजागरी साजरी करण्यात आली. हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.

Nagpur police commissioner sowed sweetness in police force | नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी पेरला पोलीस दलात गोडवा

नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी पेरला पोलीस दलात गोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देपहिल्यांदाच ‘दुग्धशर्करा योग’ : पोलीस ठाण्यात हास्यविनोद, गीतगायन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कर्तव्यकठोर निर्णय घेणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलात गोडवा पेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विविध पोलीस ठाण्यात कोजागरी साजरी करण्यात आली. हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.
झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपुरात १२ महिने मोठमोठे कार्यक्रम सुरू असतात. विधिमंडळाचे अधिवेशन, वेगवेगळ्या निमित्ताने येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, सणोत्सव तसेच वेगवेगळे कार्यक्रम या निमित्ताने शहरातील पोलीस वर्षभर बंदोबस्तात गुंतले असतात. तपास, गुन्हेगारी नियंत्रणासाठी धावपळ होत असल्याने त्यांची तारांबळ उडते. ते दडपणात येतात. पोलिसांना तणावमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहे. पोलीस तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांसाठी चांगली व तत्पर आरोग्य सेवा, पोलिसांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक सुविधा, अभ्यासासाठी वाचनालय तसेच सुदृढ आरोग्यासाठी जीम अशा सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच्या पुढचे पाऊल म्हणजे, पोलीस आणि त्यांच्या पालकांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी पोलीस दलात सुसंवाद राहावा, त्यांना एकत्रितपणे कार्यक्रम साजरे करता यावे, यासाठी डॉ. उपाध्याय यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर, नुकताच कोजागरीचा कार्यक्रम शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यात साजरा करण्यात आला. कोजागरीचा हा कार्यक्रम केवळ गोडधोड दूध वितरित करण्यापुरताच मर्यादित नव्हता. तर, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुक्तांनी त्या त्या पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी-अधिकाऱ्यांना गीत, मिमिक्री, हास्यविनोदाचे सादरीकरण करण्यासही प्रोत्साहित केले. पोलीस ठाण्यात हास्यविनोद, गीतगायन झाले. चिडून ओरडून बोलणारे पोलीस पहिल्यांदाच त्यानिमित्ताने सुसंवाद साधताना दिसले. कोजागरीच्या निमित्ताने एकाच वेळी अनेक ठिकाणी पहिल्यांदाच असा ‘दुग्धशर्करा योग’ दिसून आला.

पोलिसांना आनंदी ठेवायचे आहे : आयुक्त
जनतेच्या जानमालाच्या सुरक्षेची तसेच सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्याची पोलिसांवर जबाबदारी आहे. कर्तव्य बजावताना अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी पोलीस दडपणात येतात. त्यामुळे छोट्या छोट्या कार्यक्रमातून त्यांना आनंदी ठेवण्याचे, त्यांना प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. कोजागरीचा उपक्रम त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे, असे यानिमित्ताने लोकमतशी बोलताना डॉ. उपाध्याय म्हणाले.

Web Title: Nagpur police commissioner sowed sweetness in police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.