नागपूर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करून बांधल्या रेती तस्करांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 11:38 PM2020-11-03T23:38:36+5:302020-11-03T23:40:29+5:30

Police action on sandmafiyas, crime news भंडारा मार्गावर दबा धरून असलेल्या रेती तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक करून सोमवारी रात्री पोलिसांनी चाप लावला. सात जणांना अटक करून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Nagpur police carry out a surgical strike and arrest sand smugglers | नागपूर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करून बांधल्या रेती तस्करांच्या मुसक्या

नागपूर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करून बांधल्या रेती तस्करांच्या मुसक्या

googlenewsNext
ठळक मुद्दे५ टिप्परसह ८० लाखांचा माल जप्त : व्यापाऱ्यासह सात गजाआड, गुन्हे शाखेकडून चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा मार्गावर दबा धरून असलेल्या रेती तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक करून सोमवारी रात्री पोलिसांनी चाप लावला. सात जणांना अटक करून ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दणकेबाज कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. सोबतच त्यांना संरक्षण देणारे महसूल खाते व आरटीओतील अधिकाऱ्यांनादेखील घाम फुटला आहे.

रेती तस्करांचे रॅकेट गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सक्रिय आहे. पोलीस आणि महसूल विभागातील काही भ्रष्ट मंडळीच्या मदतीने शासनाला कोट्यवधींचा चुना लावून रेती तस्कर मालामाल बनले आहेत. रोज शेकडो ट्रक रेतीची ते चोरी-तस्करी करतात. माहिती कळाल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कारवाईची व्यूहरचना केली. त्यांनी सोमवारी रात्री भंडारा मार्गावर पोलीस चमूला पोहचण्याचे आदेश दिले. ऐनवेळी कारवाईची चाहूल लागू नये म्हणून कोणती कारवाई करणार हे कुणालाही माहीत नव्हते. ही खास काळजी घेतली गेल्यामुळे पोलिसांनी उमिया वसाहतीजवळ रेतीने भरलेले पाच टिप्प्पर पकडण्यात यश मिळवले. एकाच रॉयल्टी (पास) वर अनेक फेऱ्या मारून चोरीची रेती तस्करी करीत असल्याचे चौकशीतून लक्षात येताच पोलिसांनी उपरोक्त टिप्परच्या चालक मालकावर पारडी ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्यानुसार रेती व्यावसायिक अन्नू हरीश जैन, पवन गोविंदलाल जैन, विनोद शेषराव भोयर (कळमना) आणि टिप्पर मालक धीरज कमलाकर ढोबळे (हुडकेश्वर), सुधाकर श्यामराव बडवाईक, अनमोल आनंदराव चव्हाण आणि रमेश मोतीराम डोळस (भंडारा) यांना अटक करण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व रेतीच्या तस्करीशी संबंधित असलेले आरोपी बऱ्याच कालावधीपासून पोलीस, आरटीओ व महसूल विभागाच्या मदतीने तस्करी करत आहेत. अनेक टिप्पर मालकदेखील या रॅकेटमध्ये सहभागी आहेत. अनेकदा तर बोगस रॉयल्टी रसिदीवरदेखील रेतीची वाहतूक करण्यात येते. आरटीओ, महसूल अधिकाऱ्यांसोबतच रेती चोरीमध्ये सहभागी असलेल्या इतर लोकांची माहिती मिळावी यासाठी गुन्हेगारी षडयंत्राचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अनेक वर्षानंतर नेटवर्कला धक्का

सहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस उपायुक्त अभिनाशकुमार यांनी रेती माफियांवर दणकेबाज कारवाई केली होती. त्यानंतर तीन वर्षांपूर्वी परिमंडळ चारचे तत्कालीन पोलीस उपायुक्त (सध्याचे अतिरिक्त आयुक्त) डॉ. नीलेश भरणे यांनी दणकेबाज कारवाई करून शेकडो ट्रक रेती जप्त केली होती. त्यानंतर नागपुरातील पोलिसांचे हात बांधल्यासारखे झाले होते. रोज लाखो करोडोंची रेती तस्करी होत असल्याचे माहीत असूनही महसूल विभाग आणि पोलीस मूग गिळून गप्प बसले होते. सोमवारच्या कारवाईच्या रूपात अनेक वर्षानंतर पोलिसांकडून रेती माफियांवर कारवाई आणि चौकशीचे ठोस पाऊल उचलल्यासारखे झाले आहे. त्यामुळे रेती माफियांच्या नेटवर्कला जबरदस्त धक्का बसला आहे.

Web Title: Nagpur police carry out a surgical strike and arrest sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.