नागपुरात अद्याप समाधानकारक पाऊस नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:30 AM2019-07-08T11:30:22+5:302019-07-08T11:31:26+5:30
दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले. हवामान खात्याने २३ जून रोजी नागपुरात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. मात्र पावसाचा जोर फारसा दिसून आला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे उशिरा आगमन झाले. हवामान खात्याने २३ जून रोजी नागपुरात मान्सून दाखल झाल्याची घोषणा केली. मात्र पावसाचा जोर फारसा दिसून आला नाही. जून महिन्याच्या अखेरील झालेल्या पावसाच्या भरवशावर सरासरीच्या ४० टक्क्याचा आकडा गाठता आला. जून महिन्यापासून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शहरात २००.४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून हा आकडा समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे.
३० जूनपर्यंत नागपुरात ७२.६ मि.मी पाऊस झाला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवस थोड्या फार प्रमाणात पाऊस राहील. काळे ढग दाटून येतील. मात्र मुसळधार पावसाची शक्यता फारशी नसल्याचे चित्र आहे. रविवारी नागपुरात कमाल ३२.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले तर २४ तासात १.१ मि.मी. पावसाची नोंद झाली.
दरम्यान हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार जुलै महिन्याच्या मध्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची चिन्हे आहेत. आॅगस्टमध्येदेखील हा जोर कायम राहू शकतो. मागील वर्षी ६ जुलै रोजी नागपुरात मुसळधार पाऊस झाला होता. केवळ सहा तासात शहरात २६३.५ मि.मी.पावसाची नोंद झाली होती व शहरात सगळीकडे पाणी जमा झाले होते. यंदा असा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे मनपा तसेच जिल्हा प्रशासनाला सतर्क रहावे लागणार आहे.
तीन ते चार दिवस ठरतात धोकादायक
पावसाळ्यातील तीन ते चार दिवस हे धोकादायक ठरतात व या कालावधीत अतिवृष्टी होते. मागील दशकापासून असे चित्र दिसून येत आहे. २१ जुलै १९९४ रोजी २४ तासात सर्वाधिक ३०६.९ मि.मी.पाऊस झाला होता व हा ‘रेकॉर्ड’च ठरला. २०१३ मध्ये दोनदा १५० मि.मी.हून अधिक पाऊस झाला होता व चार लोकांचा जीव गेला होता. २०१५ मध्ये तीन लोक वाहून गेले होते. हे आकडे अग्निशमन विभागाच्या नोंदीनुसार असून याशिवाय आणखी लोकांचादेखील मृत्यू झाला होता.