- योगेश पांडे नागपूर - फिल्म प्रोडक्शन व्यावसायिकाला कोट्यवधींचे कर्ज काढून देण्याच्या नावाखाली एका महिला मॉडेलसह तिघांनी ३० लाखांचा गंडा घातला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांकडून तपासाला सुरुवात झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी मॉडेलने ती ३०० कोटींपर्यंतचे खाजगी कर्ज मिळवून देऊ शकते अशी बतावणी केली होती.
अमित परमेश्वर धुपे (४४, रडके ले आऊट) असे तक्रारादाराचे नाव आहे. त्यांचे रामनगर चौकात फिल्म प्रोडक्शनचे कार्यालय आहे. त्यांना व्यवसायासाठी कर्ज हवे होेते व त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. पाच महिन्यांअगोदर मॉडेल असलेली नीलम धनराज शिव (३०, गोकुळपेठ, वाल्मिक नगर) ही त्यांच्या कार्यालयात आली होती. त्यावेळी त्यांनी तिला कर्जाच्या आवश्यकतेबाबत सांगितले होते. तिने तिच्या पार्टनरची सरकारी बॅंकेत चांगली ओळख असल्याचा दावा केला. त्यानंतर तिने दिलीप पांडुरंग वानखेडे (५०, गजानन नगर, अकोला) याच्याशी धुपे यांची रामनगरातीलच कार्यालयात भेट करवून दिली. वानखेडेने त्याचा मुलगा शुभम हा अकोल्यातील पंजाब नॅशनल बॅंकेत रिजनल मॅनेजर असल्याचे सांगितले व ‘सीजीटीएमएस’ योजनेअंतर्गत ( क्रेडीट गॅरंटी फंड ट्रस्ट मायक्रो ॲंड एन्टरप्रायझेस) दोन कोटींचे कर्ज मिळवून देतो अशी बतावणी केली. त्याने प्रोसेसिंग शुल्क म्हणून चाळीस लाख रुपये लागतील असे सांगितले.
धुपे यांनी सुरुवातीला ३० लाख रुपये देण्याची तयारी दाखविली व ३० सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ३० लाख रुपये वळते केले. ३ ऑक्टोबर रोजी याबाबतीत लेखी करारानामादेखील झाला. करारनाम्याप्रमाणे शुभम १५ ऑक्टोबरपर्यंत कर्जाचे काम करून देणार होता व असे झाले नाही तर अतिरिक्त ५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. मात्र त्यानंतर दिलीप वानखेडे व नीलम यांनी टाळाटाळ सुरू केली. त्यांनी धुपे यांचा फोन उचलणेदेखील बंद केले. १९ डिसेंबर रोजी वानखेडेने धुपे यांना फोन करून माझ्याशी शत्रुत्व महागात पडेल या शब्दांत धमकी दिली. तर नीलमनेदेखील धुपे यांना पोलिसांत तक्रार करेन, अशी धमकी दिली. अखेर धुपे यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तीनही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मॉडेलने राजकीय लिंक असल्याचा केला दावानीलमने तिचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचा दावा करत ३०० कोटींपर्यंतचे कर्ज मिळवून देऊ शकते असे सांगितले. तिने त्यांना मोबाईलमध्ये विविध राजकीय नेत्यांसोबत काढलेले फोटोदेखील दाखविले. त्यामुळे धुपे यांचा विश्वास बसला.