लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत.कळमना फळ बाजार अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे यांनी सांगितले की, यावर्षी संत्र्यांच्या हंगामात कळमन्यात पाय ठेवायला जागा राहणार नाही, असे पीक येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण अनेक वर्षांत पहिल्यांदाच व्यापाऱ्यांनी शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून संत्रा खरेदी केला. त्यामुळे यावर्षी हव्या त्या प्रमाणात संत्रा कळमन्यात आला नाही. त्याचे कारणही योग्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना अडत आणि मालभाड्यापासून सुटका मिळाली. यंदाचा आंबिया संत्रा गोड आहे. त्यामुळे ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. दररोज १५० ते २०० टेम्पो (एक टेम्पो दोन टनापर्यंत) संत्र्यांची आवक आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. आवक मुख्यत्वे कळमेश्वर, नरखेड, काटोल, कोंढाळी, कारंजा येथून सुरू आहे. संत्रा कळमन्यातून दक्षिण भारतात विक्रीस जातो.नागपुरी संत्री नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा आणि मध्य प्रदेशाच्या छिंदवाडा या भागात जास्त होतो. याशिवाय नागपुरी संत्र्याचे पीक देशाच्या अन्य राज्यांमध्येही घेतले जाते. याचे एकूण क्षेत्रफळ जवळपास चार लाख हेक्टर आहे.डोंगरे म्हणाले, थंडी वाढताच मृगबहाराप्रमाणेच आंबिया बारचा संत्रा गोड होतो. या संत्र्यांची आवक जानेवारीपर्यंत सुरू राहील. संत्र्याच्या तुलनेत मोसंबीची आवक कमीच आहे. थंडीच्या दिवसात मोसंबीच्या रसाला जास्त मागणी असते. त्यामुळे खरेदी वाढली आहे. सध्या ४० ते ५० टेम्पो कळमन्यात येत असून, भाव २२ ते २८ हजार रुपये टन आहेत. किरकोळमध्ये जास्त भावात खरेदी करावी लागत आहे.
नागपुरात संत्र्यांची आवक वाढली : भाव आटोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:07 IST
कळमना बाजारात आंबिया संत्र्यांची आवक वाढली असून, भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असून, १२ ते २२ हजार रुपये टन भावात विक्री सुरू आहे. मात्र किरकोळ बाजारात दर्जानुसार २५ ते ५० रुपये डझन भाव आहेत. यावर्षी आवकही योग्य असून, भावही परवडणारे आहेत.
नागपुरात संत्र्यांची आवक वाढली : भाव आटोक्यात
ठळक मुद्दे यंदा आंबिया बार गोड