गणेश खवसे नागपूर, दि. 22 - सर्वसामान्य व्यक्तीला छोट्या-छोट्या कामासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र बऱ्याचदा काम न झाल्याने त्यांना आल्या पावली परतावे लागते. ही बाब लक्षात येताच शासनाने शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. याच धर्तीवर सावनेर नगर परिषदेनेही नगरपरिषद आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या उपक्रमाची सुरुवात झाली. नगर पालिकेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.यानिमित्त आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रेखा मोवाडे होत्या. नगर परिषद उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी, मुख्याधिकारी संघमित्रा ढोके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. चंद्रशेखर बरेठिया, डॉ. विजय धोटे, आनंदराव बागडे, रामराव मोवाडे, बांधकाम सभापती तुषार उमाटे, महिला व बाल कल्याण समिती सभापती नलिनी नारेकर, शिक्षण सभापती तेजस्विनी लाड, पाणीपुरवठा सभापती वनिता घुगल यांची प्रमुख उपस्थिती होती. आॅन स्पॉट काय मिळणार?या उपक्रमात एका मोबाईल व्हॅनमध्ये संगणक तसेच इतर आवश्यक साहित्य, कागदपत्रे ठेवण्यात आली आहे. ही व्हॅन म्हणजे एकप्रकारचे फिरते कार्यालय असून त्यात पालिकेचे कर्मचारीसुद्धा राहणार आहे. ही व्हॅन सावनेरातील प्रत्येक गल्लीबोळात जाईल, त्यात झोपडपट्टीचाही समावेश आहे. एखाद्याने मोबाईलवर सूचना केली की लगेच ही व्हॅन संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत जाईल. त्याला आवश्यक अर्जाची परिपूर्ती करताच त्याला दस्तावेज, प्रमाणपत्र देण्यात येईल. यामध्ये जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला, कर भरणा, अर्ज तयार करून घेणे यासोबतच इतरही विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या पैशांची, वेळेची आणि परिश्रमाची बचत होणार आहे. कार्यालयीन कामकाजावर जाणाºयांसह मजुरीवर जाणाºयांनाही आपल्या कामात अडथळा येणार नाही. सोबतच दलाल आणि इतर भानगडीचा सामना करावा लागणार नाही.जनतेच्या सुविधेसाठी तत्पर नगर परिषद आपल्या दारी या उपक्रमाद्वारे नगर परिषद प्रशासन जनतेच्या सेवेत असणार आहे. बऱ्याचदा पालिकेचे उंबरठे झिजवूनही कामे होत नसल्याची नागरिकांची ओरड असते. त्यामुळे आता आॅन स्पॉट समस्या निकाली काढण्याचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. याद्वारे प्रमाणपत्र, दस्तावेज देण्यासोबतच नाली अस्वच्छता, रस्ता डागडुजी, कचरा उचलला जात नाही या आणि अशाप्रकारच्या समस्या तत्काळ मार्गी लावणार आहे. यासाठी व्हॅनमध्ये सर्वच विभागांचे विभागप्रमुख राहतील. ज्या प्रभागात जाणार त्या प्रभागाचे नगरसेवकही आमच्या सोबतीला राहणार आहेत. सध्या प्रभागनिहाय आम्ही रूपरेषा तयार केली आहे. जनतेला चांगली सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.- संघमित्रा ढोके,मुख्याधिकारी, नगर परिषद सावनेर.
नगर पालिकाही आपल्या दारी, सावनेरात उपक्रम, मोबाईल व्हॅनद्वारे मिळेल नागरिकांना सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:23 IST