नागपुरातील शहर बससेवा ३४ तास ठप्प, प्रवासी त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 11:35 AM2018-08-11T11:35:35+5:302018-08-11T11:38:03+5:30

कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारला. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला.

Nagapur city bus service suspended for 34 hours, stricken passengers | नागपुरातील शहर बससेवा ३४ तास ठप्प, प्रवासी त्रस्त

नागपुरातील शहर बससेवा ३४ तास ठप्प, प्रवासी त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्देथकीत बिलासाठी आॅपरेटरचा संपप्रशासन व आॅपरेटरच्या वादात नागरिक वेठीस

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीचा फटका आपली बसला बसला आहे. गेल्या तीन महिन्यापासून रेड बस आॅपरेटरचे ४२ कोटी थकीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेलसाठी किमात २१ कोटी द्यावे, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र तीन कोटी आॅपरेटरच्या खात्यात जमा केले. ही रक्कम बँकांनी कर्जाच्या हप्त्यात वळती केली. यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन व डिझेल भरण्यासाठी पैसे नसल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरने शुक्रवारी अघोषित संप पुकारला. महापालिका प्रशासन व बस आॅपरेटर यांच्या वादात विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक त्रास सहन करावा लागला. शहरालगतच्या भागातही प्रवाशांना बस स्थानकांवर दिवसभर ताटकळत बसावे लागले. दुपारी ४.३० नंतर काही बसेस सुरू झाल्या.
आॅपरेटरने संप मागे घ्यावा यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र किमान ९ कोटी मिळाल्याशिवाय बसेस सोडणार नाही. अशी भूमिका आॅपरेटरने घेतली. गुरुवारी तीन कोटी व शुक्रवारी ४.५० कोटी असे एकूण ७.५० कोटी दिल्यानंतर सायंकाळी ४.३० च्या सुमारास बसेस डेपोतून सोडण्यात आल्या. मात्र दुपारी २ वाजता कामावर आलेले चालक-वाहक संपामुळे घरी परतले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा कामावर बोलवण्यात आल्याने सायंकाळपर्यंत बससेवा पूर्णपणे सुरळीत सुरू झालेली नव्हती. आॅपरेटला दर महिन्याला महापालिकेकडून घेणे असलेली रक्कम वेळेवर मिळत नाही. एप्रिल महिन्यापासून त्यांना बिल मिळालेले नव्हते. वारंवार मागणी करूनही बिल मिळत नसल्याने आॅपरेटरने संपावर जाण्याचा निर्णय घेतला. शहर बस रस्त्यांवर धावणार नसल्याची विद्यार्थी व नोकरदार यांना कल्पना नव्हती. नेहमीप्रमाणे सकाळी विद्यार्थी शाळा-महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले परंतु बस बंद असल्याने त्यांना जाता आले नाही. बसबधून प्रवास करणारे कर्मचारी सकाळी कार्यालयात जाण्यासाठी निघाले. परंतु बसेस बंद असल्याने त्यांना आॅटो वा खासगी वाहनांनी जावे लागल्याने अनेकांना वेळेवर कार्यालयात पोहचता आले नाही.

तब्बल ३४ तास बस सेवा ठप्प
गुरुवारी सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मुद्यावरून बंदची हाक दिली होती. हे निमित्त साधून आॅपरेटरने बसेस सोडल्या नाही. वास्तविक दुपारनंतर रहदारी पूर्ववत झाली होती. शहर बस सोडता आल्या असत्या परंतु थकीत रक्कम मिळावी यासाठी आॅपरेटरने बसेस सोडल्या नाही. म्हणजे शहरात तब्बल ३४ तास बस सेवा ठप्प होती. शुक्रवारी दुपारनंतरही पूर्ण बसेस रस्त्यांवर नव्हत्या.

कर्मचाऱ्यांप्रमाणे आॅपरेटवर मेस्मा का नाही
अत्यावश्यक सेवा असल्याने परिवहन विभागातील कर्मऱ्यांनी संप पुकारला तर त्यांच्यावर मेस्मा लावला जातो. २० फेब्रुवारी २०१४ रोजी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परंतु १२ तासात कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावण्यात आला. कर्मचाऱ्यांप्रमाणे आॅपेरटरला मेस्मा का लावला जात नाही, असा प्रश्न भारतीय कामगार सेनेचे अंबादास शेंडे व भाऊ राव रेवतकर यांनी केला आहे.

एक दिवसाचे उत्पन्न बुडाले
थकीत रक्कम न मिळाल्यास आॅपरेटर बसेस सोडणार नाही याची जाणीव प्रशासनाला होती. त्यानंतरही यावर तोडगा काढण्यासाठी तातडीने हालचाली करण्याची गरज होती. मात्र प्रशासनाने हा मुद्दा गांभीर्याने न घेतल्याने वेळीच तोडगा निघाला नाही. संपामुळे विद्यार्थी व प्रवाशांना हकनाक मनस्ताप सहन करवा लागला. आॅटोसाठी जादा पैसे मोजून प्रवास करावा लागला. तसेच संपामुळे महापालिकेचेही एका दिवसाचे तिकिटाचे उत्पन्न बुडाले. याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Nagapur city bus service suspended for 34 hours, stricken passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.