नागपूर : पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावानांना सत्तेची फळे चाखू देण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून विविध मंडळांवरील नियुक्त्यांना सुरुवात केली आहे. भाजपचे नगरसेवक मुन्ना (ओमप्रकाश) यादव यांची महाराष्ट्र इमारत व इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संबंधीची अधिसूचना राज्य शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातर्फे जारी करण्यात आली आहे.मुन्ना यादव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आहेत. फडणवीस यांचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे. नासुप्रच्या विश्वस्तपदी त्यांची निवड होईल, अशी भाजपमध्ये जोरात चर्चा होती. पण आता त्यांच्याकडे कामगार कल्याण मंडळ सोपविण्यात आल्यामुळे या चर्चेला विराम मिळाला आहे. यादव यांच्याप्रमाणेच बरेच पदाधिकारी महामंडळ, मंडळ व महत्त्वाच्या कमिट्यांवर नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. यादव यांच्या नियुक्तीमुळे नियुक्तीचा श्रीगणेशा झाला असून आता लवकरच आपला नंबर लागेल, अशा अनेकांच्या आशा बळावल्या आहेत. यादव यांच्याकडे अध्यक्षपद सोपविलेल्या या मंडळात नागपूरच्या आणखी दोन सदस्यांना स्थान मिळाले आहे. मालकांचे प्रतिनिधी म्हणून पी.आर. मुंडले व बांधकाम कामगारांचे प्रतिनिधी म्हणून अशोक गोविंदराव भुताड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षपदी मुन्ना यादव
By admin | Updated: June 5, 2015 02:35 IST