नागपूर : तेलाने भरलेला टँकर रेल्वे रुळावर आल्यामुळे मुंबई-हावडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना अतगाव ते आसनगाव दरम्यान सायंकाळी ७.४० वाजता घडली. यामुळे नागपूरकडे येणाऱ्या मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला १ तास रोखण्यात आले.
मुंबई-हावडा मार्गावर सायंकाळी ७.४० वाजता तेलाने भरलेला एक टँकर रेल्वे रुळावर घुसला. घटनेची माहिती या सेक्शनमधील ट्रॅक मेन्टेनर दिलीप नारायण वाघ याने तातडीने रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला दिल्यामुळे या सेक्शनमधील वाहतूक त्वरित थांबविण्यात आली. काहीच वेळात रेल्वेगाडी क्रमांक ०२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस या मार्गावरून येणार होती. परंतु वेळीच सूचना मिळाल्यामुळे विदर्भ एक्स्प्रेस थांबविण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. क्रेन, अॅक्सिडेंट रिलिफ ट्रेनच्या मदतीने रुळावर घुसलेला तेलाचा टँकर हटविण्यात आला. त्यानंतर रात्री ९.१० वाजता डाऊनलाईन आणि ९.३० वाजता अपलाईनवरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. ट्रॅक मेन्टेनर दिलीप वाघ यांच्या समयसूचकतेमुळे मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, तेलाच्या टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.............