नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव, कधी मराठा आरक्षण तर कधी अन्य तांत्रिक कारणांमुळे राज्य लोकसेवा आयोगाद्वारे करण्यात येणारी पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी अस्वस्थ आहेत. नुकताच एमपीएससीची परीक्षा दिलेल्या स्वप्नील लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. स्वप्नीलसारखी परिस्थिती हजारो विद्यार्थ्यांची आहे. ३ वर्षांपासून परीक्षा झालेल्या नाहीत. तारखाही वारंवार बदलत आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना नैराश्य आले आहे.
सरकारी नोकरी लागावी, या उद्देशाने मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पाच, सहा वर्षे मेहनत घेतात. पण, परीक्षाच होत नसतील तर त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. एमपीएससीने २०१९ पासून परीक्षा घेतल्या नाहीत. तीन-तीन वर्षे परीक्षा होत नसतील तर त्याचा परिणाम मुलींवर होतो. विद्यार्थ्यांची मेहनत पाण्यात जाते. शिवाय त्यांचे वयसुद्धा वाढत आहे.
- वारंवार पुढे ढकललेल्या परीक्षा
१) राज्य सेवा परीक्षा ४ वेळा पुढे ढकलण्यात आली. विद्यार्थ्यांच्या आक्रोशानंतर मार्च २०२१ मध्ये पूर्वपरीक्षा घेण्यात आली. आतापर्यंत निकाल लागलेला नाही.
२) संयुक्त पूर्वपरीक्षा ५ वेळा पुढे ढकलण्यात आली. मागील १८ महिन्यांपासून परीक्षा झाली नाही.
३) आरटीओची पूर्वपरीक्षा होऊन दीड वर्ष झाले. अजूनही निकाल लागलेला नाही.
४) सहा. वनसंरक्षकाच्या परीक्षेचा अंतिम निकाल गेल्या वर्षभरापासून लागलेला नाही.
५) वर्ग ‘क’च्या मंत्रालयीन पदांकरिता २ वर्षांपासून जाहिरात नाही.
६) कर साहाय्यक, महिला व बाल कल्याण अधिकारी या पदांकरिता ३ वर्षांपासून जाहिरात नाही.
- रखडलेल्या नियुक्त्या
राज्य लोकसेवा आयोगातर्फे २०१८ मध्ये राज्य सेवा परीक्षेकरिता जाहिरात काढली होती. उपजिल्हाधिकाऱ्यापासून बीडीओपर्यंतच्या १५ पदांसाठी हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मार्च २०१९ मध्ये पूर्व परीक्षा झाली. जुलै २०१९ मध्ये मुख्य परीक्षा झाली. जानेवारी २०२० मध्ये मुलाखती पार पडल्या. १९ जून २०२० मध्ये मुलाखतीचा निकाल लागला. यात ४१३ विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांच्या पदरी आले. लवकरच ते शासन सेवेत तहसीलदार, नायब तहसीलदार, बीडीओ, उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्त होतील, असे स्वप्न त्यांनी रंगविले. पण शासनाने अजूनही त्यांना नियुक्त्या दिल्या नाहीत.
- अभियंत्यांना मुलाखतीची प्रतीक्षा
एमपीएससीद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या पदासाठी २०२० मध्ये मुख्य परीक्षा झाली. ३६०० विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले. पण १२ महिन्यांपासून त्यांच्या मुलाखती झाल्या नाहीत. याच ३६०० विद्यार्थ्यांमधला स्वप्नील लोणकर हा एक विद्यार्थी, ज्याने आत्महत्या केली.
- स्पर्धा परीक्षेसाठी नोकरी सोडली. ३ वर्षे सातत्याने मेहनत घेतली. निकाल लागले, मुलाखती झाल्या. पण वर्ष झाले नियुक्त्या झाल्या नाहीत. घरचेही कंटाळले आहेत. वाट बघू नको, कामधंद्याला लाग, विसर ते सर्व असे टोमणे मिळत आहेत. अखेर शेतीचे काम सुरू केले आहे. पर्याय राहिलेला नाही.
मोहनीश सेलवटकर, नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेला उमेदवार
- मी एम.टेक. केले आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी केली. ऑगस्ट २०२० मध्ये मेन्सचा निकाल लागला. ३६०० उमेदवारांमध्ये मीसुद्धा एक आहे. सरकार कधी कोरोनाचे, कधी मराठा आरक्षणाचे कारण सांगून विद्यार्थ्यांचे खच्चीकरण करीत आहे. घरातील लोकांचा दबाव आहे. सामाजिक प्रेशर वेगळा आहे. नोकरी नाही. हतबलता आली आहे.
रुतुजा नाईक, उमेदवार
- स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी सर्व काही सोडून तयारी करतात; पण परीक्षाच होत नाही. विद्यार्थी टार्गेट ठेवून अभ्यास करतात. परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थ्यांचे टार्गेट हरवलेले आहे. त्यातच कोरोनामुळे घरची परिस्थिती खराब आहे. क्लासेस बंद असल्याने त्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भविष्य उज्ज्वल बनविणाऱ्या विद्यार्थ्यांना आपले भविष्य अंधारात दिसत आहे. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा उत्साह राहिलेला नाही. वय वाढलेले आहे, नोकरी नाही. या सर्वांमुळे विद्यार्थी प्रचंड दडपणात आला आहे. तो आर्थिक, मानसिक आणि शैक्षणिक समस्येत गुरफटला आहे.
डॉ. सुरेश जाधव, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक