नागपूर : उत्पन्नातील वाढ व अखर्चित निधीमुळे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक रकमेचा राहणार आहे. त्यामुळे सदस्यांना २०१५-१६ या वर्षात सेस फंडातून विकास कामासाठी जादा निधी मिळणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यासाठी विविध विभागाकडून वित्त विभागाने नियोजन मागितले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक निधी मिळणार असल्याने जाणकार सदस्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील कामे सुचविली आहेत. ३५ ते ३८ कोटींच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यात रखडलेले रस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीची कामे विचारात घेता बांधकाम विभागाला झुकते माप मिळण्याची अपेक्षा आहे. अध्यक्ष निशा सावरकर यांच्याकडे असलेल्या लघु सिंचन विभागासाठी मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी जादा निधी मिळण्याची शक्यता आहे. यातून पाझर तलाव, उपसा जलसिंचन, योजना मार्गी लागण्याला मदत होईल.गेल्या वर्षी जि.प. इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी ३८ लाख , सभागृह व समिती कक्षासाठी २३ लाख, सरपंचभवन बांधकामासाठी १५ लाख, अस्थायी निवासस्थाने दुरुस्तीसाठी ३५ अशी १.११ कोटीची तरतूद करण्यात आली होती. यावेळी या खर्चात बचत होणार आहे. त्यामुळे सरपंच भवन परिसरातील जि.प.च्या जागेवर लॉन निर्माण करण्यासाठी तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती वित्त समितीच्या सदस्यांनी दिली. जि.प.च्या नवीन इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी तरतूद केली जाणार आहे. शाळांना संगणक उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, खेळाचे साहित्य पुरविणे यासाठी तरतूद केली जाणार आहे. (प्रतिनिधी)
जि.प.सदस्यांना अधिक निधी
By admin | Updated: February 11, 2015 02:32 IST