केवळ १६०० ‘ट्री-गार्ड’ : वर्षभरात मनपाने लावली २३ हजार झाडेनागपूर : ‘ग्रीन सिटी’ अशी ओळख असलेल्या उपराजधानीतील हिरवळ आणखी वाढविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रयत्न सुरू आहेत. वर्ष २०१३-१४ या वर्षात लोकसहभागातून महानगरपालिकेने २३ हजारांहून अधिक झाडे लावली आहेत. यातील २२ हजारांहून अधिक झाडे कुंपणाशिवायच असल्याची बाब माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर शहरात लोकसहभागाद्वारे १ एप्रिल २०१३ ते ३० जून २०१४ या कालावधीत किती झाडे लावण्यात आली व किती ठिकाणी झाडांना कुंपण घालण्यात आले अशी माहिती विचारली होती. नागपूर महानगरपालिकेने वर्षभरात २३ हजार ७१७ झाडे लावली. यापैकी २२ हजार ११७ झाडे कुंपणाशिवायच लावण्यात आली आहे. केवळ १६०० ठिकाणी ‘ट्रीगार्ड’मध्ये वृक्षारोपण करण्यात आले असे या माहिती अधिकारात नमूद करण्यात आले आहे. १४ व्यक्तींना कारणे दाखवा नोटीसया कालावधीत उपराजधानीत २५ व्यक्तींनी झाडे तोडण्याबद्दल परवानगी मागितली. यासाठी ४३ लाख ४ हजार ८१५ रुपये ‘डिपॉझिट’ म्हणून घेण्यात आले. या कालावधीत बेकायदेशीररीत्या वृक्षतोड केल्याप्रकरणी १४ व्यक्तींना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली. या सर्वांविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी)
कुंपणाशिवायच जगताहेत २२ हजारांहून अधिक झाडे
By admin | Updated: September 21, 2014 01:14 IST