रामटेक : माेबाईलमध्ये व्हिडीओ बनवून आराेपीने विवाहित महिलेचा विनयभंग केला. शिवाय, तिची बदनामी करण्याची धमकी दिली. दरम्यान, पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास ताब्यात घेतल्यानंतर सूचनापत्रावर त्याची सुटका करण्यात आली. ही घटना रामटेक पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरला येथे शनिवारी (दि.५) दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
आराेपी निखिल भीमराव खाेब्रागडे (२७, रा. वाॅर्ड क्र. ३, नेरला, ता. रामटेक) हा पीडित महिलेच्या घराच्या खिडकीतून रात्री लपून पाहत हाेता. त्याने ‘तुमचा व्हिडीओ माझ्या माेबाईलमध्ये असून, तुम्ही मला जर भेटायला आले नाही तर हा व्हिडीओ मी तुमच्या नवऱ्याला व गावातील लाेकांना दाखवून बदनामी करेल’अशी धमकी देत आराेपीने पीडितेला शरीरसुखाची मागणी करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून रामटेक पाेलिसांनी आराेपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ (ड), ५०६ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. आराेपीची सूचनापत्रावर सुटका करण्यात आली असून, या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक मीना बारंगे करीत आहेत.