मोहफुले म्हणजे फक्त दारूच नव्हे.. 'हे' पण आहेत फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 07:30 AM2021-05-07T07:30:00+5:302021-05-07T07:30:02+5:30

Nagpur News आता मोहफुलांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आदिवासींना सीझनमध्ये आर्थिक फायदा मिळेल. सोबतच पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

Mohfule is not just for alcohol .. there are many benefits | मोहफुले म्हणजे फक्त दारूच नव्हे.. 'हे' पण आहेत फायदे

मोहफुले म्हणजे फक्त दारूच नव्हे.. 'हे' पण आहेत फायदे

googlenewsNext
ठळक मुद्देबंदी उठल्याने प्रक्रिया उद्योगाला मिळेल चालनारोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यास महत्त्वपूर्ण


निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोहफूल म्हटले की त्यापासून तयार होणारी गावठी दारू हे समीकरण जणू गृहितच धरले गेले आहे. या गृहितकामुळेच त्याच्या असंख्य पौष्टिक फायद्याकडे दुर्लक्ष करून गेल्या कित्येक वर्षांपासून मोहफुलांवर बंदी घातली गेली. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना आर्थिक लाभ देणारे हे साधन हिरावले. आता मोहफुलांवरील बंदी उठविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे आदिवासींना सीझनमध्ये आर्थिक फायदा मिळेल. सोबतच पर्यावरणपूरक प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल, असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.

मोहफुलांवरील बंदी उठविण्यासाठी नागपूरचे डॉ. शांतिलाल कोठारी यांच्या नेतृत्वात २०-२५ वर्षांपासून लढा चालविला होता. त्यांच्या निधनानंतर का होईना या लढ्याला यश आल्याची भावना गडचिरोलीत कार्य करणारे डॉ. सतीश गोगुलवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, दारू केवळ मोहापासून बनते असे नाही. द्राक्षे, ऊस, संत्री याशिवाय तांदूळ, गव्हापासूनही दारू तयार केली जाते. मात्र यावर बंदी घातली गेली नाही. पण मोहफुलांवर बंदी घालणे अनाकलनीय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रिशनच्या रिपोर्टनुसार मोहफुलांमध्ये द्राक्षांपेक्षा अधिक न्यूट्रिशन असते, शिवाय व्हिटॅमिन ए, डी आणि कॅल्शियमसाठीही मोहाचे महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्राक्षे किंवा संत्र्यांवर कीटनाशकांचा मारा असतो. पण मोह म्हणजे कोणतीही फवारणी न करता तयार झालेले शुद्ध नैसर्गिक खाद्य होय. मात्र केवळ दारूशी संबंध जोडून आदिवासी समाजाच्या शुद्ध खाद्याला दूर ठेवण्यात आल्याची खंत डॉ. गोगुलवार यांनी व्यक्त केली. कोरोना काळात रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी मोहफुलांचे महत्त्व समजले आहे.

एक कुटुंब गोळा करते एक-दीड टन मोह
डॉ़ गोगुलवार यांनी सांगितले, गडचिराली भागात सीझनच्या वेळी बहुतेक कुटुंब मोहफुले गोळा करतात. एक कुटुंब या १०-१२ दिवसाच्या काळात एक ते दीड टन मोहफुल गोळा करतात. हे मोहफुल ४०-४५ रुपये दराने विकले जातात. म्हणजे सीझनमध्ये त्यांना २०-२५ हजाराचा धनलाभ होतो. मात्र खरेदी करणारे भीती दाखवून कमी दरात खरेदी करतात. बंदी उठविल्याने त्यांना कायदेशीरपणे ते विकता येईल. डॉ. गोगुलवार यांच्या पुढाकारातून कोरची भागात गावकऱ्यांना मोहफुल गोळा करण्यासाठी प्रेरित केले. वनहक्क प्राप्त ग्रामसभा व वनधन विक्री केंद्राच्या माध्यमातून ते खरेदी करण्यात येत असून नागरिकांना आर्थिक लाभ मिळत आहे. आदिवासी समाजाद्वारे मोहफुल झाडाला माऊली म्हणून ओळखले जाते. म्हणून त्यांनी या वृक्षांना जतन करून ठेवले आहे.

तरुण उद्योजकांनी पुढे यावे

आदिवासींच्या अन्नात कायम मोहफुलांचा समावेश राहिला आहे. मोहापासून लाडू, मिठाई, ज्यूस आदी गोष्टी तयार केल्या जातात. प्रक्रिया करून इतरही अनेक पौष्टिक खाद्यपदार्थ तयार करता येतील. मोहफुलांसह इतर वनसंपदेसाठी प्रक्रिया उद्योग स्थापन करून त्याचा प्रसार करता येईल. त्याची मार्केटिंग करून निर्यात करण्याची क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे तरुण उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. गोगुलवार यांनी केले.

 

Web Title: Mohfule is not just for alcohol .. there are many benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल