दुर्घटनेची शक्यता विचारात घेता मनपाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या प्रवर्तन विभागाने धंतोली झोन क्षेत्रातील मॉडेल मिल चाळ जीर्ण झाली आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अपघात होण्याची शक्यता विचारात घेता बुधवारी या इमारतीचा जीर्ण भाग तोडला.
ही चाळ जुनी असून मॉडेल मिल मधील कामगारांना राहण्यासाठी उभारण्यात आली होती. चाळीचा काही भाग जीर्ण झाल्याने अपघाताची शक्यता होती. यामुळे प्रशासनाने ही कारवाई सुरू केली.
प्रवर्तन विभागाच्या पथकाने कारवाई दरम्यान १० बाय १० च्या १५०० चौ. फुटाची दोन मजली इमारत पाडली. अरुंद रस्त्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने तोडकाम करता येत नव्हते यामुळे रस्ता रुंद करण्यासाठी आठ बांधकाम तोडण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार पुरेसा पोलीस बंदोबस्त केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. उपायुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बागडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. यावेळी प्रवर्तन विभागाचे संजय कांबळे, अभियंता नीलेश सांभारे, श्रीकांत चिमंत्रवार उपस्थित होते.
...