वाडी : दत्तवाडी येथील गुरुदत्त सभागृहात प्राथमिक आरोग्य केंद्र, व्याहाड आणि वाडी नगर परिषदेच्या पुढाकाराने २५ मार्चपासून कोविड लसीकरण सुरू करण्यात आले. या केंद्रावर आतापर्यंत तीन हजाराहून अधिक नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. वाडीत ४५ वर्षांवरील जवळपास १५ हजार नागरिक असल्यामुळे दररोज ७०० च्यावर लसीकरण होत आहे. विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, वाडी नगर परिषदचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी या केंद्राला भेट दिली असता अधिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक सूचना देऊन नागरिकांच्या मिळत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. वाडी नगर परिषद क्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना अंमलात आणण्यात येत असल्याची माहिती मुख्याधिकारी प्यारेवाले यांनी दिली. नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी सध्या ५४ आशावर्कर आणि ६५ शिक्षकांची सेवा घेण्यात येत आहे. प्रत्येक व्यक्तीस १० जणांना लसीकरण केंद्रावर पाठविण्याचे कार्य दिले आहे. सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचारी घरोघरी भेट देऊन लसीकरणाची आवश्यक माहिती गोळा करीत आहेत. १५ दिवसात शहरातील लसीकरणाचा डेटा गोळा करण्यात येईल. लसीकरण मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्यारेवाले व डॉ. सचिन हेमके यांनी केले आहे.
वाडीत मिशन कोविड लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST