लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिकीट तपासणीसांच्या (टीसी) सतर्कतेमुळे एका अल्पवयीन मुलाचा अंधातरी होत असलेला प्रवास थांबला आणि नंतर तो सुखरूप त्याच्या कुटुंबीयात पोहोचला. सोहम (नाव काल्पनिक) बेपत्ता झाल्याने त्याच्या अस्वस्थ पालकांनाही तो परत आल्यामुळे दिलासा मिळाला.
ही घटना बुधवारी २३ जुलैची आहे. ट्रेन नंबर २२११० मुंबई एलटीटी सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या कोच नंबर एस-०९ मध्ये टीसी राजेंद्र सालम हे कर्तव्यावर होते. गाडी वर्धेवरून धामणगावकडे निघाली असताना तिकीट तपासताना सालम यांना एक अल्पवयीन मुलगा भेदरलेल्या अवस्थेत दिसला. बल्लारशाहून मुंबईकडे निघालेल्या या सुपरफास्ट ट्रेनमध्ये तो एकटाच असल्याची जाणीव झाल्याने सालम यांनी लगेच रेल्वे सुरक्षा दलाचे आर. एस. खांडेकर, संजय खंडारे, मनोज आसोले आणि उमेश धुराट यांना माहिती दिली. ते कोचमध्ये पोहोचल्यानंतर सर्वांनी सोहमची विचारपूस सुरू केली. घरगुती वादविवादानंतर या सोहमने घर सोडल्याचे आणि तो मुंबईला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला धामणगाव रेल्वे स्थानकावर उतरवून घेण्यात आले. ही माहिती नागपूर रेल्वे कंट्रोल रूमच्या माध्यमातून त्याच्या पालकांना दिल्यानंतर सोहमला बडनेरा येथील चाइल्डलाइनला सोपविण्यात आले. दरम्यान, मुलगा बेपत्ता झाल्याने त्याचे पालक कमालीचे अस्वस्थ झाले होते. तो सुखरूप असल्याचे कळाल्याने पालकांनी लगेच बडनेराकडे धाव घेतली. कायदेशीर कारवाईनंतर मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
त्याला धोक्याची कल्पनाच नव्हतीघरदार सोडून कुटुंबीयांना कोणतीही माहिती न देता मुंबईला निघालेल्या सोहनचे तेथे गेल्यानंतर काय करायचे, कुठे राहायचे, याबाबत कसलेही नियोजन नव्हते. मुंबई २४ तास जागे असणारे शहर आहे. त्यामुळे कुठेही काम करून राहू, अशी त्याची कल्पना नव्हती. तेथे समाजकंटकांच्या हातात लागल्यानंतर त्याचे भवितव्य काळोखमय झाले असते, याचीदेखील त्याला कल्पना नव्हती. चाइल्डलाइनच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला हे सर्व धोके सांगून त्याचे समुपदेशन केल्यानंतर तो घरी परत जाण्यास राजी झाला.