लोकमत न्यूज नेटवर्क
कोलकाता : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या रिंगणात ‘एआयएमआयएम’देखील उतरणार असल्याची घोषणा पक्षप्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. पक्ष नेमका किती जागांवर निवडणूक लढेल याबाबत २७ मार्च रोजी स्पष्टता येणार असली तरी इतर पक्षांचे नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. राज्यात मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची चिन्हे असून सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसला त्याचा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तविला आहे.
अब्बास सिद्दीकी यांची ‘आयएसएफ’ बंगालमध्ये डावे पक्ष व कॉंग्रेससोबत निवडणुकीत असल्याने ओवैसी रिंगणात उडी घेणार नाहीत असे दावे करण्यात येत होते. मात्र चौथ्या टप्प्याचे अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी ओवैसी यांनी ही घोषणा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. २७ मार्च रोजी सागरदिधी येथील जाहीर सभेत ते जागांबाबत घोषणा करणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांची संख्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. अनेक जागांवर तर मुस्लीम मतदारांची टक्केवारी अर्ध्याहून अधिक आहे. अशा स्थितीत ‘एआयएमआयएम’मुळे बंगालमध्ये मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची दाट शक्यता आहे.
१३ ते १५ जागांचे नियोजन बिघडणार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एआयएमआयएम’ १२ ते १५ जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता आहे. यात मुर्शिदाबादचादेखील समावेश असेल. ओवैसी हे भाजपला फायदा पोहोचविण्यासाठी निवडणूक लढतात असे आरोप अनेकदा विविध पक्षांकडून लावण्यात आले आहेत. पश्चिम बंगालच्या शेवटच्या चार टप्प्यांमधील निवडणुकांत मुस्लीमबहुल मतदारसंघ जास्त आहेत. त्यामुळे अचानक ओवैसी यांच्या येण्याने या जागांवर पक्षांना नियोजन बदलावे लागणार आहे.