शरद मिरे
भिवापूर : नागपूर जिल्ह्यात १२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. गावागावात राजकीय फड रंगले आहेत. मात्र भिवापूर तालुक्यात आलेसूर व मोखाबर्डी या दोन ग्रा.पं.मध्ये होणारी निवडणूक यंदा मायलेकीच्या उमेदवारीने चर्चेत आली आहे. हिरकन्या जगन धनविजय रा. मोखाबर्डी तर मंजू विजय फुलझेले रा. खोलदोडा अशी या मायलेकींची नावे आहेत. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या हिरकन्या धनविजय या मोखाबर्डी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच आहेत. त्या मोखाबर्डी ग्रा.पं. च्या वॉर्ड क्र.२ करिता आरक्षित अ. जाती महिला प्रवर्गातून निवडणूक लढत आहेत. तर हिरकन्या यांची ३७ वर्षीय विवाहित मुलगी मंजू विजय फुलझेले रा. खोलदोडा ही आलेसूर ग्रा.पं.च्या वाॅर्ड क्र.३ च्या आरक्षित अ. जाती प्रवर्गातून निवडणूक लढत आहे. मंजू यापूर्वी आलेसूर ग्रामपंचायतीची सदस्य राहिली आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसने ग्रामपंचायत निवडणुकीत मंजूला तिकीट न देता तिच्या जाऊला तिकीट दिले. त्यामुळे मंजू अपक्ष रिंगणात होती. मात्र तरीही दोन मतांनी तिने विजय प्राप्त केला. या निवडणुकीत या मायलेकीतून कोण बाजी मारते, याकडे दोन्ही गावांचे लक्ष लागले आहे.
आलेसूरमध्ये १,७२६ तर मोखाबर्डीत १,५५७ मतदार
तालुक्यात मोखाबर्डी, आलेसूर, पुल्लर या तीन ग्रामपंचायतीत प्रत्येकी ९ जागांकरिता निवडणूक होत असून तिन्ही ग्रामपंचायतींची एकूण मतदारांची संख्या ५,५२० आहे. यात मोखाबर्डी १,५५७, आलेसूर १,७२६ तर पुल्लर येथे २,२३७ मतदार आहेत. यात मोखाबर्डीमध्ये २५, आलेसूरमध्ये २९ तर पुल्लरमध्ये १९ उमेदवार रिंगणात आहे. महत्त्वाचे म्हणजे तालुक्याचा ग्रामीण भाग हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मात्र जिल्हा परिषदेचे दोन्ही गट व पंचायत समितीच्या चार गणात काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदार कोणत्या गटाला पसंती दर्शवितात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.