नागपूर : म्हाडाच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एक योजना रखडण्याच्या अवस्थेत आहे. वाडी येथे म्हाडाने अल्प उत्पन्न गटासाठी मोकळ्या जागेवर ८८ भूखंडाची योजना राबविली. २००० मध्ये या भूखंडाचे वाटप करण्यात आले. गेल्या १५ वर्षात म्हाडाने येथे कुठल्याही प्राथमिक सोयी उपलब्ध करून दिल्या नाही. त्यामुळे भूखंडावर घर कसे बांधायचे असा प्रश्न भूखंडधारकांनी केला आहे. यासंदर्भात काही भूखंडधारकांनी मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे. गणेशपेठ येथील रहिवासी किशोर गणपतराव वाघमारे यांना २००० मध्ये ८८ एलआयजी योजनेत भूखंडाचे वाटप करण्यात आले. आजच्या परिस्थितीत म्हाडाने या योजनेत कुठल्याही प्राथमिक सोयी केल्या नाही. येथे रस्ता नाही, वीज नाही. मलवाहिनी, पाण्याची व्यवस्था येथे नाही. त्यामुळे घर कसे बांधायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यापुढे आहे. गेल्या १५ वर्षात कुठल्याही सोयीसुविधा नसल्याने, कुठला भूखंड कुण्या लाभार्थ्याचा आहे, हेही सांगता येत नाही. या योजनेवर काम करणारे अभियंत्यालाही त्याची माहिती नाही. ही योजना अविकसित असल्याने, भूखंड विकायला काढल्यावर, विकत घ्यायला कोणी तयार नाही. अनेकांनी आयुष्याची पुंजी म्हणून म्हाडाचा भूखंड घेतला. मात्र त्याचा उपयोग नसेल तर, भूखंड काय कामाचा? असा सवाल भूखंडधारकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास मंत्रालय असल्याने त्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालून भूखंडधारकांना न्याय द्यावा, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. (प्रतिनिधी)
म्हाडाच्या भूखंडाची पुन्हा बोंबाबोंब
By admin | Updated: April 9, 2015 02:56 IST