नागपूर : कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान नागपूर शहरात लॉकडाऊन केले आहे. दरम्यान आवश्यक प्रवासी सेवा सुरू राहणार आहे. त्यामुळे महामेट्रोनेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या आहेत. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी मेट्रो स्थानकावर सतर्कता बाळगण्याच्या सूचना अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मेट्रो रेल्वे ५० टक्के क्षमतेने चालविण्याचा महत्त्वाचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.
मेट्रो रेल्वेच्या ऑरेंज लाईनवर सीताबडी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू राहणार आहे. तर अॅक्वा लाईनवर सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन दरम्यान सकाळी ६.३० ते रात्री ८ दरम्यान दर १५ मिनिटांनी प्रवाशांना सेवा देण्यात येईल. दरम्यान प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. विना मास्क प्रवाशांना मेट्रो स्थानकावर प्रवेश देण्यात येणार नाही. स्टेशनवर प्रत्येक प्रवाशाचे तापमान तपासण्यात येत आहे. यात कुणाचे तापमान अधिक वाटल्यास स्टेशन नियंत्रक याची माहिती आरोग्य विभागाला देणार आहेत. प्रत्येक प्रवाशाला सॅनिटायझर देण्यात येईल. मेट्रो स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना हात धुवावे लागणार आहेत. मेट्रो ट्रेनमधून प्रवासी उतरल्यानंतरच इतर प्रवाशांना कोचमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवाशांनी लिफ्ट किंवा इतर उपकरणांच्या बटनांना, एस्केलेटर बारला हात लावू नये, याची काळजीही घेण्यात येत आहे. तसेच मेट्रो स्टेशनवर काऊंटर तिकीट देण्याऐवजी डिजिटल पद्धतीने तिकीट देण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो रेल्वे, स्टेशनचे सातत्याने सॅनिटायझेशन करण्यात येत आहे.
...........