नागपूर : सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास आकाशात उल्कावर्षावाचे दृश्य बघायला मिळाले. हे दृश्य बघून लोक रोमांचित झाले. जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात अनेक नागरिकांनी हा उल्कावर्षाव बघितल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वी सूर्याच्या विरुद्ध दिशेने गेल्यास उल्कापात होतो. रमण विज्ञान केंद्र व तारामंडळाचे शिक्षण अधिकारी अभिमन्यू भेलावे यांनी सांगितले की, १५३ वर्षांनंतर पहिल्यांदाच हे दृश्य आशियाई देशात पाहायला मिळाले. पृथ्वीच्या परिक्रमेदरम्यान लहान-मोठ्या वस्तू तिच्या कक्षात येतात. गुरुत्वाकर्षणामुळे या वस्तू पृथ्वीकडे आकर्षिल्या जातात. हवेमुळे या वस्तूंचे एकमेकांशी घर्षण झाल्यामुळे त्यातून निघणाऱ्या अग्निज्वाला बाहरे पडतात. त्या जमिनीवर पडताना दिसतात. त्यालाच उल्कापात म्हटल्या जाते. तज्ज्ञांच्या मते, ३२०० पॅथॉन नावाचा एक लघु ग्रह प्रत्येक १.४३ वर्षात सूर्याची एक परिक्रमा पूर्ण करतो. १३ व १४ डिसेंबर या काळात पृथ्वी व पॅथॉन हा ग्रह एकाच मार्गाने परिक्रमा करतो. त्यामुळे पॅथॉन पृथ्वीच्या वायुमंडळाच्या संपर्कात येतो. पॅथॉनच्या सोबत फिरणाऱ्या उल्का पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत आल्या. त्यामुळे उल्कापात झाल्याचे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
नागपुरात उल्कावर्षाव
By admin | Updated: December 15, 2015 05:10 IST