लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वातावरणातील आर्द्रता काहीशी वाढल्याने तपमानात किंचितशी वाढ झाल्याचे दिसून आले. गोंदिया, भंडारा वगळता विदर्भातील सर्व शहराच्या किमान तापमानात वाढ होऊन ते १० अंशाच्या वर पोहचले. मात्र थंडीच्या तडाख्यातून नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता सध्यातरी दिसून येत नाही. दिवसेंदिवस गारठा अधिकाधिक वाढत असल्याचे जाणवत आहे.इंग्लंडहून आलेल्या नव्या कोरोनाच्या भीतीने राजकीय ताप वाढला असून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र निसर्गानेच लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. रात्री बोचऱ्या थंडीने घरात बसून राहणे भलाईचे वाटत आहे. त्यामुळे रात्री काही अपवाद वगळता बाहेर निघणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दरम्यान, विदर्भात दिवसा आणि रात्रीच्या तापमानात किंचित वाढ नोंदविण्यात आली. गोंदिया व भंडाऱ्याच्या तापमानात ०.६ अंशाची वाढ होऊन ते ९.४ अंशावर गेले. त्यापाठोपाठ यवतमाळचे तापमान १० अंश नोंदविण्यात आले. नागपुरात शुक्रवारी १०.१ अंशाची नोंद झाली. त्यानंतर वर्धा ११.२ अंश, चंद्रपूर ११.६ अंश, गडचिरोली ११, वाशिम ११, अकोला ११.४, बुलडाणा १२.६ तर अमरावतीत १४.७ अंश किमान तापमानाची नोंद हवामान खात्याने केली आहे. अमरावतीत तापमानात मोठी वाढ दिसून येत आहे.