माेहपा : मनाेरुग्ण महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दतील माेहपा येथे शुक्रवारी (दि. १२) सकाळी उघडकीस आली.
कल्याणी मंगेश टाकरखेडे (२२, रा. कळमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा २०१९ मध्ये मंगेश नत्थूजी टाकरखेडे, रा. कळमेश्वर याच्याशी विवाह झाला हाेता. लग्नानंतर काही दिवसातच तिचे मानसिक संतुलन बिघडले. ती कधी माेहपा येथील तिचे नातेवाईक रत्नाकर नेरकर यांच्याकडे यायची तर कधी फेटरी येथील युवराज क्षीरसागर यांच्याकडे जायची. फेटरी हे तिचे माहेर असून, ती अनेकदा तीन-चार दिवस बेपत्ता असायची, अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी माेहपा येथील बॅरिस्टर शेषराव वानखेडे महाविद्यालयासमोरील सावनेर बायपास राेडलगत असलेल्या विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पाण्याबाहेर काढला. तिने दाेन ते तीन दिवसापूर्वी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी, असा अंदाजही पाेलिसांनी व्यक्त केला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद केली असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक खडसे करीत आहेत.