नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सकाळी नागपूर येथे मेयो आणि मेडिकल रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि अन्य अधिकाऱ्यांशी एकूणच परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली.
या दोन्ही रुग्णालयात दाखल होत असलेले रुग्णांचे प्रमाण, उपलब्ध सुविधा आणि इतरही एकूणच स्थितीचा आढावा घेत, प्रशासनाकडून वा सामाजिक क्षेत्रातून काय मदत लागणार यासंदर्भातील तपशीलवार माहिती त्यांनी घेतली.
आ. प्रवीण दटके, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. पी. पी. जोशी, डॉ. अविनाश गावंडे, डॉ. लांजेवार इत्यादी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
फडणवीस यांनी सकाळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) पदाधिकाऱ्यांचीसुद्धा भेट घेतली आणि आणखी २०० खाटा वाढविण्यासंदर्भात नियोजन कसे करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा केली. आयएमएने केवळ तज्ज्ञ मनुष्यबळ द्यावे आणि बाकी सुविधा तसेच इतर मनुष्यबळ महापालिका देईल, असे यावेळी सांगण्यात आले. डॉक्टरांना या काळात येत असलेल्या अडचणी, सरकारकडून त्यांच्या अपेक्षा याबाबतसुद्धा आयएमएने माहिती दिली. आमदार प्रवीण दटके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे, डॉ. मंजूषा गिरी, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. काटे आणि डॉ. निखाडे उपस्थित होते.
त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी गांधीनगर, नागपूर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट देऊन डॉक्टरांशी चर्चा केली आणि एकूणच व्यवस्थेची माहिती घेत आढावा घेतला. महापौर दयाशंकर तिवारी आणि अन्य लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या रुग्णालयात ९६ कोविड रुग्णसुद्धा दाखल आहेत आणि सध्या लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. १,१९४ कोविड रुग्ण आतापर्यंत बरे झाले असून सुमारे २३,००० लसीकरण झाले आहे. येणाऱ्या काळात आयसीयू सुविधा निर्माण करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुभाष नगर लसीकरण केंद्राला भेट दिली आणि नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.