लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवे आर्थिक वर्ष लागण्यास अवघे ४० दिवस शिल्लक आहेत. मालमत्ता कर वसुलीसंदर्भात प्रत्येक झोनला उद्दिष्ट निर्धारित करून देण्यात आलेले आहे. आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी अर्थात ३१ मार्चपूर्वी निर्धारित उद्दिष्टाच्या कमीतकमी ८० टक्के मालमत्ता कर वसुली करा, असे निर्देश कर संकलन व कर आकारणी समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी बुधवारी बैठकीत दिले.
कर निर्धारक व कर संग्राहक दिनकर उमरेडकर, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, अशोक पाटील, विजय हुमने, गणेश राठोड, हरीश राऊत, सहायक आयुक्त किरण बगडे, सुषमा मांडगे, साधना पाटील, कर अधीक्षक गौतम पाटील, सहायक कर अधीक्षक पांडुरंग शिंदे व सर्व झोनचे सहायक कर अधीक्षक उपस्थित होते. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपाद्वारे १५ डिसेंबर २०२० पासून ‘अभय योजना’ जाहीर करण्यात आली. २० जानेवारी २०२१ पर्यंत या योजनेंतर्गत ४८.५२ कोटी थकीत मालमत्ता कर वसुली झाल्याची माहिती देण्यात आली.