मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे पुन्हा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 08:21 PM2020-02-06T20:21:16+5:302020-02-06T20:22:02+5:30

फेब्रुवारी महिन्याची सहा तारीख येऊनही वेतन न झाल्याने परिचारिकांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले. दुपारी ४ वाजतानंतर वेतन खात्यात जमा होताच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती.

Mayo: Again agitation of nurses to pay | मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे पुन्हा आंदोलन

मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे पुन्हा आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसहा तासांच्या कामबंद आंदोलनानंतर मिळाले वेतन : रुग्णसेवा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिन्याचे वेतन पाच तारखेच्या आत होण्याच्या मागणीसाठी जानेवारी महिन्यात इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) परिचारिकांनी कामबंद आंदोलन केले होते. आता फेब्रुवारी महिन्याची सहा तारीख येऊनही वेतन न झाल्याने परिचारिकांनी पुन्हा आंदोलन हाती घेतले. दुपारी ४ वाजतानंतर वेतन खात्यात जमा होताच परिचारिकांनी आंदोलन मागे घेतले. सहा तास चाललेल्या आंदोलनामुळे रुग्णसेवा प्रभावित झाली होती.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून मेयोच्या परिचारिकांचेच वेतन २५ तारखेनंतरच होते. या संदर्भात महाराष्ट्र गव्हर्न्मेंंट विदर्भ नर्सेस असोसिएशनने मेयो प्रशासनाला वारंवार कळविले. परंतु वेळेवर वेतन होत नसल्याची समस्या कायम होती. जानेवारी महिन्यात २९ तारीख येऊनही वेतन मिळाले नव्हते. यामुळे परिचारिकांनी सकाळी १०.३० वाजेपासून कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. आंदोलनात सहभागी परिचारिका कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांना भेटायला गेल्या असता ११ वाजूनही ९० टक्के लिपिक व वरिष्ठ अधिकारी हजर नव्हते. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी वेतनासाठी तातडीने हालचाली केल्या. यामुळे दोन तासांतच वेतन परिचारिकांच्या खात्यात जमा झाले. असोसिएशनतर्फे महिन्याच्या पाच तारखेपर्यंत वेतन मिळण्याच्या मागणीचे निवदेन अधिष्ठात्यांना देण्यात आले. यामुळे फेब्रुवारी महिन्याचे वेतन वेळेवर होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सहा तारखेपर्यंत परिचारिकांचे वेतन न झाल्याने असोसिएशनच्या सरचिटणीस प्रभा भजन यांच्या नेतृत्वात १५०वर परिचारिकांनी कामबंद आंदोलन पुकारले.
असोसिएशन मेयोच्या कार्याध्यक्ष मीनाक्षी रामटेककर म्हणाल्या, वेळेवर वेतनाची समस्या परिचारिकांबाबतच का होते, याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपले काम चोख बजावल्यास महिन्याच्या एक तारखेला वेतन मिळणे सहज शक्य आहे. परंतु दरवेळी कुठलेतरी कारण समोर करून उशीर केला जातो. वेतन उशिरा होत असल्याने अनेकांच्या कर्जाचे हफ्ते थकतात. यामुळे संबंधित बँका व्याज आकारत असल्याने आर्थिक फटका बसतो. या शिवाय, मागील वर्षीचा ‘टीडीएस’ अद्याप जमा झाला नाही. सातव्या वेतन आयोगाची अग्रिम राशी ४४ परिचारिकांना मिळालेली नाही. सर्व्हिस बुक पडताळणी झाली नाही. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सेवानिवृत्त झालेल्या परिचारिकांना पेन्शन नाही. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठीही हे कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. रुग्णसेवेला फटका बसू नये म्हणून प्रत्येक वॉर्डातील दोनपैकी एक परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या, असेही त्या म्हणाल्या.

वेतन न झाल्यास दर ५ तारखेला आंदोलन
१ किंवा २ तारखेपर्यंत वेतन देण्याच्या मागणीचे निवेदन पुन्हा एकदा अधिष्ठात्यांना देण्यात आले आहे. पुढील महिन्यापासून या तारखेला वेतन न झाल्यास दर ५ तारखेला कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
मीनाक्षी रामटेककर
कार्याध्यक्ष, महाराष्ट्र गव्हर्नमेंट विदर्भ नर्सेस असोसिएशन, मेयो

 

Web Title: Mayo: Again agitation of nurses to pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.