नागपूर : लकडगंज येथील एका कार्यालयात लूट करणारा गुन्हेगार बंटी ऊर्फ माऊझर मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. गरोबा मैदान निवासी २१ वर्षीय माऊझरने २४ नोव्हेंबरच्या रात्री टेलिफोन एक्सचेंज जवळील दिनेश जाकोटिया यांच्या गायत्री सेल्समध्ये लुटपाट केली आणि २५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरले होते. लकडगंज पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात माऊझरचा हात असल्याचे स्पष्ट झाले. त्याला अटक करून त्याच्याकडून साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पीआय पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुनील राऊत व त्यांच्या चमूने केली.
नजर चुकवून उडविली वृद्धेची चेन
नागपूर : वाटसरू वृद्धेची नजर चूकवून तिच्या गळ्यातील चेन उडविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. जुनी मंगळवारी निवासी ६२ वर्षीय अंजनाबाई पराते सोमवारी सकाळी महाल येथील व्यास गल्लीतून जात होत्या. भाजपा कार्यालयाजवळ एका युवकाने अंजनाबाईला साडी देण्याचे प्रलोभन दिले. बोलणे सुरू असतानाच नजर चुकवून त्या युवकाने अंजनाबाई यांच्या गळ्यातील २० हजार रुपये किमतीची चेन उडवून गायब झाला. कोतवाली पोलिसांनी दगाबाजीचे प्रकरण नोंदविले आहे.
विवाहसोहळ्यात महिलेचा हार चोरला
नागपूर : एका विवाहसोहळ्यात महिलेचा दीड लाख रुपये किमतीचा हार चोरी गेला आहे. स्वावलंबीनगर निवासी प्रतीक शर्मा त्याच्या आत्याचा मुलगा केदार लहरियाच्या विवाहसोहळ्यात २८ नोव्हेंबर रोजी बेसा रोड येथील श्रीपाद लॉनमध्ये आले होते. प्रतीकच्या तक्रारीनुसार जुन्या वादविवाद प्रकरणात सुनील लहरिया, सौरभ लहरिया, अतुल लहरिया, अशोक लहरिया, किशोर लहरिया, अनिकेत लहरिया, धनराज लहरिया, अजय ऊर्फ कैलाश लहरिया व त्यांच्या साथीदारांनी सुरा दाखवून आईचा सोन्याचा हार चोरला. प्रतीकच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी लुटमारीचा गुन्हा नोंदविला आहे.