नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 09:36 PM2020-01-08T21:36:14+5:302020-01-08T21:42:23+5:30

केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली.

Massive rally against CAA, NRC in Nagpur: involvement of several organizations including Bahujan Kranti Morcha | नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग

नागपुरात सीएए, एनआरसी विरोधात विशाल रॅली : बहुजन क्रांती मोर्चासह अनेक संघटनांचा सहभाग

googlenewsNext
ठळक मुद्देनागरिकत्त्व सुधारणा कायद्याचा कोट्यवधी हिंदूंना बसेल फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्त्व सुधारणा कायदा (सीएए) तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व एनपीआर विरोधात बुधवारी नागपुरात विशाल रॅली काढण्यात आली. देशातील घुसखोर आणि बाहेरच्या देशातील मुस्लिमांची भीती दाखवून हे कायदे करण्यात आले आहेत. मात्र या कायद्यांचे दुष्परिणाम मुस्लिमच नाही तर ४० टक्के हिंदूंनाही भोगावे लागतील, असा आरोप करीत हे कायदे ताबडतोब रद्द करण्याची मागणी करून हवे तर डिएनएच्या आधारावर एनआरसी आणण्याची मागणी करण्यात आली. 


बहुजन क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात अनेक संघटना या रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. यामध्ये मुस्लिम संघटनांसह ओबीसी, बौद्ध, ख्रिश्चन, सिख तसेच महिलांची संख्या लक्षणीय होती. दुपारी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बडकस चौक, गोळीबार चौक, अग्रसेन चौक, मोमीनपुरा, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, एलआयसी होत संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचे सभेचे रुपांतर करण्यात आले. या सभेदरम्यान व्यासपीठावर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे विदर्भ अध्यक्ष अ‍ॅड. रहमत अली, बहुजन क्रांती मोर्चाचे रविकांत मेश्राम, रवी घोडेस्वार यांच्यासह जेयुएच-एचे हाफीज बासित, सिराज अ. कासिम, डब्ल्यूपीआयचे कबीर खान, एआयएमएमएमचे शाहिद रंगुनवाला, एमआयएमचे शहर अध्यक्ष जावेद अख्तर, अल्फा ओमेगाचे पास्टर गायकवाड, ऑल इंडिया फोरमचे मोहम्मद शाहीद, भीम पँथरचे मनोज बन्सोड, तेली समाजाचे विकी बेलखोडे, एनटीडीएनटीचे दीपक ढोके, नवसंघटनाचे पी.के. मेश्राम, भीम आर्मीचे चिमणकर, रिझवानुर्रहमान खान, बुद्धिस्ट संघटनेचे शरद वासे, प्रफुल्ल पाटील, महेश शहारे, बीकेएमचे अध्यक्ष कमलेश सोरते, कुणबी बीकेएमचे गणेश चौधरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

मुस्लिम समुदायाविरोधात असल्याचे सांगण्यात येत असले तरी बहुसंख्य हिंदूंना या कायद्यामुळे त्रास सहन करावे लागणार असल्याचे वक्त्यांनी सांगितले. अनेक भटक्या जमाती, रोजगारासाठी कायम स्थलांतर करणारे, असंघटीत क्षेत्रात काम करणारे आणि गरीब, अशिक्षित नागरिकांना या कायद्यामुळे होरपळावे लागणार आहे. देशात बेरोजगारी, अनेक कंपन्या बंद होणे, शासकीय संस्थांचे खाजगीकरण, शैक्षणिक अभाव व अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना अशा मूळ समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी मुस्लिमांची भीती दाखवून हा कायदा करण्यात आल्याचा आरोप वक्त्यांनी केला.

राष्ट्रीय प्रतिकांचा समावेश लक्षवेधी
रॅलीमध्ये सर्व समाजाच्या नागरिकांचा समावेश असला तरी अपेक्षेप्रमाणे तरुण व महिलांची संख्या लक्षणीय होती. उल्लेखनीय म्हणजे जातीय प्रतीक चिन्हांपेक्षा राष्ट्रीय प्रतीक चिन्हांचा समावेश लक्षवेधी ठरला. हातात तिरंगा ध्वज उंचावण्यासह मानवी श्रुंखला करून त्यामध्ये काही फुटाचे तिरंगा ध्वज घेउन तरुण रॅलीमध्ये चालत होते. संविधानाच्या प्रतिकासह छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र झळकवित होते. विविध बॅनरद्वारे केंद्र शासनाचा निषेध नोंदविला जात होता. तरुणांद्वारे ‘इन्कलाब जिंदाबाद’ व ‘हमे चाहिए आझादी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या..

Web Title: Massive rally against CAA, NRC in Nagpur: involvement of several organizations including Bahujan Kranti Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.