नागपूर : वैशालीनगरमधील एका फटाक्यांच्या साठवणुकीच्या गोदामाला बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली. आग इतकी तीव्र होती की सतत होणाऱ्या स्फोटांमुळे संपूर्ण परिसर हादरला आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ९ गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. स्फोटांच्या भीतीने पोलिसांनी गोदामाच्या आजुबाजूचा परिसर तातडीने सील केला. आगीच्या मोठ्या लोळामुळे बघ्यांची मोठी गर्दी आजुबाजूच्या रस्त्यांवर जमली होती.
अग्निशमन विभागाने आग नियंत्रणात असल्याची माहिती दिली. परंतु अजूनही आग विझवण्याचे काम सुरू आहे. असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.