- लोकमतचा प्रभाव
नागपूर : शासनाने राज्यात एन-९५ मास्क १९ ते ४९ रुपयापर्यंत तर दुपदरी आणि तीनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. शिवाय, उपलब्ध मास्कचा फलक किमतीनुसार औषध दुकानाच्या बाहेर लावण्याचे निर्देशही दिले. परंतु लोकमत चमूने याबाबतची ‘रिॲलिटी चेक’केली असता ‘एन ९५’ मास्क कुठे १०० तर कुठे १५० रुपयात मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आणले. याची दखल घेत औषध प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली. परिणामी, शहरातील काही दुकानांमध्ये मास्कच्या किमतीचे फलक दिसून येऊ लागले आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंध म्हणून मास्क महत्त्वाचा घटक आहे. दरम्यानच्या काळात मास्कच्या किमतीत प्रचंड प्रमाणात वाढल्या. याचा भुर्दंड सर्वसामान्य जनतेला पडला. याच्या तक्रारी झाल्या. अखेर शासनाने मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन केली. समितीने उत्पादित मालाच्या उत्पादनाचा खर्च व त्याची योग्य किंमत ही ‘कॉस्ट ऑडिटर’ यांच्या सहाय्याने निर्धारित केली. मास्कच्या निर्धारित दराबाबत अध्यादेशही काढले. परंतु काही औषध विक्रेते जादा पैशाच्या हव्यासापोटी अध्यादेशालाच काळे फासत असल्याचे चित्र ‘लोकमत’ने ‘४९ रुपयाचा मास्क १५० रुपयात’या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल औषध प्रशासनाने घेऊन कारवाईला सुरुवात केली. परिणामी, काही औषध दुकानांमध्ये मास्कचे दरफलक लागले. परंतु काही दुकानांनी कारवाईच्या भीतीने मास्कची विक्रीच करणे बंद केले आहे.