शहरातील प्रमुख व्यापारीपेठ सीताबर्डी, सदर, गोकुलपेठ, महाल, खामला, सक्करदरा, धरमपेठ, जरीपटका, इंदोरा, कमाल चौक, इतवारी, लकडगंज, पारडी, नंदनवन, वाडी येथील दुकाने प्रतिष्ठाने बंद होती. या परिसरात केवळ जीवनावश्यक सेवा प्रदान करणारी दुकाने उघडण्यात आली होती. रस्त्यावरील वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत असल्याचे बघून व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन केवळ मार्केट बंद ठेवण्यासाठीच लावला का? असा सवाल उपस्थित केला आहे.
- रहिवासी एरियात सर्वच बिनधास्त
लॉकडाऊन असताना शहरातील रहिवासी एरियामधील उद्यान, मैदानात युवक दिसून आले. वस्त्या, गल्ल्यांमध्ये लोक समूहाने गप्पा करताना दिसून आले. मॉर्निंग वॉक, इव्हिनिंग वॉकच्या नावावर लोक फिरताना दिसले. शहरातील रहिवासी एरियात, कॉलनींमध्ये सर्व बिनधास्त होते. अनेक मैदाने खुले असल्याने तरुणांनी त्यावर ताबा घेतलेला दिसून आला.
कोट्यवधीचा व्यापार ठप्प
लॉकडाऊनमुळे दोन दिवसापासून व्यापार ठप्प पडला आहे. दोन दिवसात किमान ५०० कोटी रुपयांचा व्यापार प्रभावित झाल्याची माहिती नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सकडून देण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले की, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या फटक्यातून अजूनही व्यापारी उठला नाही. त्यातच पुन्हा लॉकडाऊन लावून व्यापाऱ्यांची अडचण वाढविली आहे. ते म्हणाले की, २१ मार्चपर्यंत चालणाऱ्या या बंदमुळे किमान १२०० कोटी रुपयांचा व्यापार प्रभावित होणार आहे.