नागपूर : शेतकरी हा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मुख्य घटक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले तर अडतियांचे उत्पन्न वाढेल. त्यामुळे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्च कमी करू न त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. कृषी उत्पन्न बाजार समिती, नागपूर व इफ्को यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आयोजित ‘एनसीडीईएक्स सेंटर उभारणीकरिता सेमिनार’ या कार्यक्रमात ते बोलत होते. सिव्हिल लाईन्स परिसरातील चिटणीस सेंटरच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला आमदार सुनील केदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अहमद शेख, इफ्कोचे सतीश गाडगे व एनसीडीईएक्सचे रवींद्र शेवडे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले,‘कम्युनिटी एक्सजेंच’मध्ये केवळ कागदावर व्यवहार चालतो. अनेकांच्या मते, महागाई वाढण्याचे ते एक कारण ठरत आहे. त्यामुळे याचा अभ्यास झाला पाहिजे. शिवाय विदर्भातील शेतकऱ्यांच्या पीक पद्घतीत बदल करू न, त्यांना कमी खर्चात अधिक उत्पन्न झाले पाहिजे. मात्र सध्या त्याच्या उलट स्थिती आहे. त्यामुळे बाजार समित्यांनी शेतकऱ्यांना कमी किमतीत बी-बियाणे व खते कसे उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. सध्या सोयाबीनचे एकरी उत्पादन फारच कमी झाले आहे. त्यामुळे तेलबिया व डाळबियांचे उत्पादन वाढविणे एक आव्हान ठरले आहे. दुसरीकडे शेतकरी जो माल उत्पादित करतो, त्याचे योग्य मार्केटिंग होत नाही. त्यामुळे त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यादिशेनेही बाजार समित्यांनी विचार केला पाहिजे. या कृषी उत्पादन क्षेत्रात ‘इनोव्हेशन व टेक्नॉलॉजी’च्या उपयोगासाठी बाजार समित्यांनी पुढाकार घ्यावा. सरकार खताच्या किमती २०० ते ३०० रुपयांपर्यंत कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले तर अहमद शेख यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
बाजार समित्यांनी शेतकऱ्यांसाठी पुढाकार घ्यावा
By admin | Updated: November 9, 2015 05:39 IST