उमरेड : ग्रामीण भागात लॉकडाऊनचा निर्णय झाला नसला तरी उमरेड येथे शनिवार आणि रविवार दोन दिवस जुन्या नियमाप्रमाणे बाजारपेठा बंद राहतील. तालुक्यात लॉकडाऊनचा निर्णय झाला नसला तरी नागरिकांनी नियमाचा भंग करू नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीने दिला आहे.
दरम्यान, रुग्णसंख्या वाढली अथवा नागरिक योग्य दिशानिर्देशानुसार वागत नसल्याची बाब समोर आल्यास या परिसरातही ‘लॉकडाऊन’बाबत पाऊल उचलले जाऊ शकते, असेही बोलल्या जात आहे. उमरेड येथे सोमवार हा आठवडी बाजार असतो. मागील आठवड्यात नागरिकांच्या गर्दीने नियमावलीचे धिंडवडे काढले होते. नियमांची पायमल्ली केल्यानंतर लोकमतने आपत्ती व्यवस्थापन समितीचे याकडे लक्ष वेधले. या बाबींची दखल घेत यंदा सोमवारी चोख बंदोबस्त आणि कर्मचाऱ्यांची बेरकी नजर राहणार आहे. नियमित भरविला जाणारा सोमवारी आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत होणार नसल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. शिवाय दुकाने, प्रतिष्ठाने रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे. नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये, विनाकारण गर्दी करू नये असे आवाहनसुद्धा केले जात आहे.
अन्य चौकात का नाही?
उमरेड शहरातील श्री संत जगनाडे महाराज भिसी नाका चौक परिसरातच मास्कबाबतची कारवाई केली जाते. अन्य चौकात कोणतीही चमू दिसत नाही. याचाच फायदा घेत असंख्य नागरिक वेगवेगळ्या युक्त्या लढवीत बारकाईने पळ काढतात. त्यामुळे या चौकासह इतवारी मुख्य मार्ग, जुने बसस्थानक, पोलीस स्टेशन परिसर आदी ठिकाणीही या पथकाने कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.