पावसामुळे आंब्याचे भाव उतरले; विक्रीवरही परिणाम : बैगनपल्लीची आवक वाढली

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 25, 2024 08:04 PM2024-04-25T20:04:30+5:302024-04-25T20:04:52+5:30

नागपूर : अवकाळी पावसामुळे आंब्याच्या विक्रीवर परिणाम झाला असून भावही उतरले आहेत. कळमना फळे बाजारात संपूर्ण मार्च महिन्यात १०० ...

Mango prices fall due to rain; | पावसामुळे आंब्याचे भाव उतरले; विक्रीवरही परिणाम : बैगनपल्लीची आवक वाढली

पावसामुळे आंब्याचे भाव उतरले; विक्रीवरही परिणाम : बैगनपल्लीची आवक वाढली

नागपूर : अवकाळी पावसामुळे आंब्याच्या विक्रीवर परिणाम झाला असून भावही उतरले आहेत. कळमना फळे बाजारात संपूर्ण मार्च महिन्यात १०० ते १३० रुपयांवर पोहोचलेले बैगनपल्लीचे भाव सध्या दर्जानुसार ३० ते ५५ रुपये किलोपर्यंत घसरले आहेत. पावसामुळे भाव आणि विक्रीत घसरण झाली आहे. मात्र, किरकोळ बाजारात दुप्पट आणि अडीचपट भाव आहेत.

बैगनपल्लीची ८० टक्के विक्री

सध्या कळमन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फ्रूट बाजारात बैगनपल्ली, हापूस, तोतापल्ली, नाटी, दशेरी आंब्याची विक्री सुरू आहे. बैगनपल्ली आंध्रप्रदेश आणि तेलंगाना या राज्यातून येतो. ५ ते ७ टन क्षमतेच्या जवळपास १०० गाड्यांची आवक असून ठोकमध्ये ३० ते ५५ रुपये भाव आहेत. सर्व आंब्याच्या तुलनेत बैगनपल्लीची ८० टक्के विक्री होते.

तोतापल्ली, नाटी व दशेरीलाही मागणी

कळमन्यात तोतापल्ली आंब्याची आवक आंध्रप्रदेशातून होत आहे. २० किलो क्षमतेच्या ३०० हून अधिक क्रेट दररोज येत असून भाव २० ते २५ रुपये किलो आहेत. शिवाय नाटी आंब्याची आंध्रप्रदेशातून ५ ते ७ टनाची एक गाडी दररोज येत आहे. १५ ते २० रुपये किलो भाव आहेत. रसासाठी दशेरी आंब्याचे चाहते आहेत. २ ते ३ टन क्षमतेच्या ५ ते १० गाड्यांची आवक असून भाव ३० ते ६० रुपये किलो आहे. 

लंगडा आंब्याची आवक सोमवारपासून

विदर्भातील लंगडा आंब्याची आवक सोमवारपासून सुरू होईल. हा आंबा दरवर्षी कुही, मांढळ, भिवापूर, अड्याळी, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्ह्यातून येतो. एक ते दीड टन क्षमतेच्या टेम्पोने आंबे कळमन्यात विक्रीसाठी येतात.

हापूस आंब्याचे ग्राहक वेगळेच

कोकणातील हापूस आंबा महागच आहे. हा आंबा खरेदी करणारा वर्गही वेगळाच आहे. हे ग्राहक थेट कळमन्यात येऊन खरेदी करतात. रत्नागिरीचा हापूस आंब्याचे भाव दर्जानुसार ६०० ते एक हजार रुपये डझन आहेत. सध्या दररोज एक डझन क्षमतेच्या ३०० हून अधिक पेट्यांची आवक होत आहे.

आंब्याचे उत्पादन जास्त, भाव आटोक्यात

कळमन्यातून बैगनपल्ली आंबे लगतचे राज्य आणि देशात विक्रीसाठी पाठविले जातात. सर्व आंब्यांमध्ये ८० टक्के बैगनपल्लीची विक्री होते. हे आंबे मार्चमध्ये विक्रीसाठी आले, तेव्हा १०० ते १३० रुपये किलो तर आता ३० ते ५५ रुपये भाव आहेत. काही ग्राहक हापूस आंबे खरेदीसाठी कळमन्यात येतात. भाव कमी होणार नाहीत. आंब्याची आवक १५ जूनपर्यंत सुरू राहील.
आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट मार्केट अडतिया असोसिएशन.

Web Title: Mango prices fall due to rain;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.