जि. प. शिक्षकांच्या सर्वसाधारण बदलीबाबत ग्रामविकास विभागाकडून ७ एप्रिल रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अवघड गावांची निश्चिती करायची आहे. त्याकरिता दिलेल्या सात निकषांपैकी किमान तीन निकष पूर्ण करणे अनिवार्य आहे. परंतु काही तांत्रिक कारणाअभावी मे २०१८चे बदलीत निश्चित करण्यात आलेल्या गावांचा समावेश या यादीत होऊ शकला नाही. त्यामुळे गेली तीन वर्षे त्या गावात सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. त्यांना यावर्षीच्या बदली प्रक्रियेत सुद्धा संधी मिळणार नाही. या सर्व शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील गावांमध्ये मागील तीन वर्षे केलेली सेवा यावर्षीच्या बदल्यांसाठी ग्राह्य धरली जावी. त्याकरिता २०१८ मध्ये झालेल्या बदलीत ठरविण्यात आलेले अवघड क्षेत्र कायम ठेवण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. यासंदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, राजू बोकडे आदींनी निवेदन दिले आहे.
२०१८च्या शिक्षक बदलीतील अवघड गावेही कायम ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:07 IST