लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई शहरातील कुलाबा ते माहीम, पश्चिम उपनगरात बांद्रा ते दहिसर, पूर्व उपनगरात विक्रोळी ते चुनाभट्टी आणि मानखूर्द तसेच चेना व काजुपाडासह मीरा भाईंदर महानगरपालिका या सर्व क्षेत्रात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अर्थात महावितरणला वीज वितरणासाठी परवाना मिळावा, अशी मागणी करणारी याचिका कंपनीने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केली आहे.
मुंबईत सध्या बेस्ट ही सार्वजनिक कंपनी आणि अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड व टाटा पॉवर मुंबई या दोन खासगी कंपन्या वीज पुरवठा करतात. त्यांना समांतर परवाना देऊन महावितरणला मुंबईतही वीज पुरवठा करण्यास परवानगी मिळावी, अशी याचिका कंपनीने केली आहे. महावितरण सध्या मुंबई शहर व उपनगरातील वर उल्लेख केलेले क्षेत्र वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वीज वितरण करते. मुंबई शहरातील मुलुंड व भांडूप या दोन उपनगरात महावितरण वीज पुरवठा करते. मुंबईची सध्याची विजेची गरज ४ हजार मेगावॅट आहे तर महावितरण सध्या राज्यात दररोज २६ हजार मेगावॅट वीज पुरवठा करत आहे.
मुंबईच्या रियल इस्टेटवर नजरकोस्टल मार्ग आणि मेट्रो जाळ्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. निवासी रिअल इस्टेट क्षेत्रासह औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्राचा मोठा विस्तार होत आहे. डेटा सेंटर्सही वाढत आहेत. या खेरीज सेवा क्षेत्रातील अनेक व्यवसायांचा विस्तार होत आहे. महावितरणची यावर नजर आहे.
महावितरणवर एक नजर
- ग्राहकांची संख्या : ३ कोटी १७ लाख वीज ग्राहक
- वीज उपकेंद्रे - ४२३०
- उच्च दाब फीडर्स - २५ हजार - वितरण ट्रान्सफॉर्मर्स - ९ लाख ६० हजार
- ११ केव्ही लाईन - ३.६४ लाख किमी
- ३३ केव्ही लाईन - ५१,७७१ किलोमीटर
- शहर - ४५७ - गावे - ४१,९२८
वीज दरात कपातीचा प्रस्तावमहावितरणने रिसोर्स ॲडेक्वसी प्लॅननुसार राज्याची सध्याची ४२ हजार मेगावॅटची विजेची क्षमता आगामी पाच वर्षात ८१ हजार मेगावॅटवर नेण्यासाठी वीज खरेदी करार केले आहेत. यामध्ये हरित ऊर्जेवर भर दिला असून कंपनीला किफायतशीर दरात वीज मिळणार आहे. त्यामुळे महावितरणने प्रथमच आपल्या ग्राहकांसाठी वीजदरात कपातीचा प्रस्ताव आयोगासमोर सादर केला आहे.