नागपूर : अखिल भारतीय पुलक मंच परिवार महाल शाखेच्यावतीने भारत गौरव राष्ट्रसंत आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव यांच्या आरोग्यासाठी महाशांतिधारा करण्यात आली.
इतवारी शहीद चौक भगवान पार्श्वनाथ मार्ग येथील श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिरात भगवान महावीर यांची महाशांतिधारा पुलक मंच परिवारातील सदस्यांनी केली. १० दिवसांपूर्वी आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेव यांच्यासह प्रणितसागरजी मुनिराज, ब्र. प्रदीपभैया, ब्र. प्रसूनभैया यांच्यासह १८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यावेळी या सर्वांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी देव-शास्त्र-गुरु पूजन, गुरुदेव पूजन करण्यात आले. श्रीपार्श्वप्रभु दिगंबर सैतवाल जैन मंदिराचे अध्यक्ष दिलीप शिवणकर, महामंत्री दिलीप राखे यांच्या उपस्थितीमध्ये महाशांतिधारा करण्यात आली. पुलक मंच परिवार महाल शाखेचे कार्याध्यक्ष जितेंद्र गडेकर, महामंत्री नितीन पळसापुरे, मनोज मांडवगडे, दिलीप सावळकर, राजेंद्र सोनटक्के आदींनी पूजन केले.
दिलीप शिवणकर म्हणाले, जैन संत आपल्या समाजाचा पाया आहेत. आपले संतगण ॲलोपॅथी औषधांचे सेवन करीत नाही. अशा परिस्थितीमध्ये संतमंडळी कोरोना पॉझिटिव्ह येणे हा समाजाच्या दृष्टीने काळजीचा विषय आहे. आचार्यश्री पुलकसागरजी गुरुदेवांचे देशभरात लाखों भक्त आहेत. या सर्व भक्तगणांच्या प्रार्थनेतून गुरूदेवांचे आरोग्य सुधारेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. कोरोना संक्रमण झाले असताना व अंगात ज्वर असतानाही आचार्यश्री यांच्या धार्मिक क्रिया पूर्ववत सुरू आहेत. या अभिषेक प्रसंगी प्रभाकर डाखोरे, डॉ. चंद्रनाथ भागवतकर, किशोर कहाते, प्रशांत कहाते उपस्थित होते.