लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून शुक्रवारी ‘हायव्होल्टेज’ पोलिटिकल ड्रामा घडला. भाजपच्या पाचव्या यादीतही बावनकुळे यांचे नाव आले नाही. उमेदवारी कुणाला यावर तर्कवितर्क लावले जात असतानाच बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी पहिल्या सत्रात भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
मात्र, त्यांना शेवटपर्यंत ए-बी फॉर्म मिळाला नाही. अखेरच्या क्षणी जि.प.च्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर आणि माजी जि.प.सदस्य अनिल निधान यांनी अर्ज दाखल केले व या दोघांचीही नावे असलेला ए-बी फॉर्म पक्षातर्फे निवडणूक अधिकाऱ्याकडे देण्यात आला. ए-बी फॉर्मवर पहिल्या क्रंमाकावर टेकचंद सावरकर तर दुसऱ्या क्रंमाकावर अनिल निधान यांचे नाव होते. तांत्रिकदृष्ट्या सावरकर हे भाजपचे अधिकृत उमेदवार ठरले. शेवटी भाजपच्या यादीतही सावरकर यांचेच नाव जाहीर करण्यात आले.ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे कर्तृत्व, कामाचा सपाटा व पक्षातील लोकप्रियता पाहता त्यांना भाजपची उमेदवारी मिळणार नाही, असा विचारही भाजपचेच कार्यकर्ते नव्हे तर कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता करू शकत नाही. मात्र, एकामागून एक यादी येत असताना बावनकुळे यांचे नाव जाहीर होत नसल्यामुळे धाकधूक वाढली होती. अशातच गुरुवारी रात्री शहरातील एका हॉटेलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट झाली. या भेटीनंतर रात्री रामगिरी येथेही या दोघांची बैठक झाली होती. तीत कामठीतील उमेदवारीबाबत चर्चाही झाली. यानंतर शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप उमेदवारांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत बावनकुळे सहभागी झाले. मात्र, त्यावेळीही बावनकुळे यांना उमेदवारी मिळणार की नाही, हे स्पष्ट नव्हते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न करूनही दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडून अखेरपर्यंत त्यांच्या नावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. शेवटी त्यांची पत्नी ज्योती बावनकुळे यांना अर्ज भरण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या. ज्योती यांना अर्ज भरताना दुपारी ३ वाजेपर्यंत पक्षाचा ‘बी’ फार्म दिला जाईल, असे असे सांगण्यात आले होते. मात्र, शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडून सकारात्मक संदेश आला नाही.शेवटची १५ मिनिटे शिल्लक असताना जि.प.च्या माजी अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर आणि माजी जि.प.सदस्य अनिल निधान धावपळ करीत निवडणूक अधिकारी कार्यालयात पोहचले. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. पाठोपाठ भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार व भाजपचे संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी बंद लिफाफ्यातील ‘बी’ फार्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिला. त्यात पहिल्या क्रमांकावर टेकचंद सावरकर तर दुसऱ्या क्रमांकावर अनिल निधान यांचे नाव होते. मात्र हा घटनाक्रम संपत नाही तोच भाजप नेते आनंदराव राऊत तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल निधान हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. शेवटी या नाट्यमय घडामोडीनंतर सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास भाजपने पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. यात टेकचंद सावरकर यांच्या नावाचा समावेश होता.कार्यकर्त्यांना भावना अनावर, घरासमोर ठिय्या अन् रास्ता रोको
- दुपारी १.१५ वाजता : ज्योती बावनकुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार, टेकचंद सावरकर, अनिल निधान आणि निवडक कार्यकर्त्यांसह भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कामठी येथे पोहोचल्या.
- दुपारी १.२० : ज्योती बावनकुळे यांनी भाजपकडून कामठीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
- दुपारी १.३० : ज्योती बावनकुळे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
- दुपारी २.४५ वाजता : टेकचंद सावरकर आणि अनिल निधान यांनी तहसील कार्यालयात येत उमेदवारी अर्ज दाखल केले.
- दुपारी २.५० : भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार आणि संघटनमंत्री श्रीकांत देशपांडे भाजपचा ‘बी’ फार्म घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पोहोचले.
- दुपारी ३.३० वाजता : डॉ.पोतदार यांनी भाजपकडून ‘बी’ फार्मवर पहिल्या क्रमांकावर टेकचंद सावरकर आणि दुसऱ्या क्रमांकावर अनिल निधान यांचे नाव असल्याचे पत्रकारांना सांगितले.
- दुपारी ४.०० वाजता : भाजप नेते आनंदराव राऊत कामठीत पोहोचले. त्यांनी अनिल निधान हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याची माहिती दिली.
- सायंकाळी ५ वाजता : टेकचंद सावरकर आणि अनिल निधान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षातून बाहेर पडले. ज्योती बावनकुळे यांना पक्ष उमेदवारी देत असेल तर आम्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
- सायंकाळी ५.१५ वाजता : भाजपने उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करीत टेकचंद सावरकर हे पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.