लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील शासकीय वीज निर्मिती कंपनी महानिर्मितीच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचे वेतन हे महिना भरण्याच्या दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या खात्यात जमा होत असते. परंतु यावेळी मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिना लागूनही मिळालेले नाही. त्यामुळे महानिर्मिती कंपनीतील कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये त्यांच्या भविष्याबाबत चिंता पसरली असून यासंदर्भात कंपनीतील विविध कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन वीज क्षेत्र बचाव कृती समिती अंतर्गत व्यवस्थापकीय संचालकांना यासंदर्भात पत्र लिहून वेतन तात्काळ देण्याची मागणी केली आहे.
महानिर्मितीमध्ये प्रत्येक महिन्याला दोन दिवस अगोदरच वेतन मिळते. ३१ तारखेचा महिना असेल तर २९ तारखेलाच वेतन जमा होते. सुटी येत असेल तर तीन दिवसापूर्वी जमा होते. गेल्यावर्षी लॉकडाऊन दरम्यान संपूर्ण वसुली बंद होती. अशा परिस्थितीतही वेतन वेळेवर जमा झाले. यावेळी वसुली चांगली झाली आहे. असे असतानाही वेतन देण्यास उशीर का झाला? याची कर्मचाऱ्यांना चिंता आहे. कर्मचारी कमी करण्याचा कुठला विचार तर नाही ना, अशी शंकाही अनेकांना आहे. याबाबत कंपनीतील विविध संघटनांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कृती समिती स्थापन केली. तसेच याबाबत अधिकाऱ्यांना पत्र लिहून तात्काळ वेतन देण्याची मागणी केली.