व्यास बिनविरोध, भाजपचा जल्लोष : काँग्रेस नेत्याच्या गुप्तभेटीचीच चर्चानागपूर : विधान परिषदेची मुंबईतील भाई जगताप यांची जागा सेफ करण्यासाठी काँग्रेसने भाजपशी तह करीत नागपुरात माघार घेतली. पक्षाचा हा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना रुचलेला नाही. मुंबईसाठी नागपूरचा बळी का, असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणात घोडेबाजार चालणारी ही निवडणूक बिनाधक्क्याने आटोपल्यामुळे भाजप वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. निवडणूक जिंकण्यासाठी लागणारे संख्याबळ भाजपकडे होते. मात्र, शिवसेनेसह मित्रपक्षांची धाकधूक होती. दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांनी ‘ताकदीने’ रिंगणात उतरण्याची तयारी चालविली होती. संख्याबळ नसतानाही राजेंद्र मुळक यांनी चक्र फिरविले होते, हा या निवडणुकीचा इतिहास आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची शुक्रवारी रात्री वर्धा रोडवरील बड्या हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर ग्रामीणमधील काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची हॉटेलमध्ये जाऊन गुप्त भेट घेतली. मात्र, भाजपच्या बैठकीसाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना याची हवा लागली. भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोषनागपूर : सकाळपर्यंत या ‘गुप्त’ भेटीची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. या भेटीत संबंधित काँग्रेस नेत्याने उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची हमी दिली. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होईल, असा दावा भाजप पदाधिकारी सकाळपासूनच करीत होते. काँग्रेस वर्तुळातून या घडामोडीची माहिती प्रदेशाध्यक्षांनाही कळविण्यात आली. शेवटी मुंबईत भाजपने माघार घेतल्याने नागपुरात काँग्रेसची उमेदवारी मागे घ्या, असा आदेश प्रदेश काँग्रेसकडून आला व काँग्रेसजनांना नांगी टाकावी लागली. गिरीश व्यास यांच्या बिनविरोध निवडीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी धंतोली कार्यालयासह बडकस चौकात आनंदोत्सव साजरा केला. नेते व पदाधिकाऱ्यांनी व्यास यांना शुभेच्छा दिल्या. व्यास यांनी वाड्यावर जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व आभार व्यक्त केले. यानंतर व्यास यांनी संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांचे आशीर्वाद घेतले. रविवारी टिळक पुतळा कार्यालयात सकाळी ११ वाजता भाजप नेते व कार्यकर्ते एकत्रित येत जल्लोष करणार आहेत. (प्रतिनिधी)मुळकांना होती दगाफटक्याची भीतीभाजपच्या हाती गेलेली विधान परिषदेची ही जागा माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी खेचून आणली होती. मात्र, या वेळी मुळक यांनी लढण्यास नकार दिला. मुळक यांना पक्षाने मंत्रिपद दिले, पण त्यानंतरही मुळक यांनी पळ काढला, असा ठपका काँग्रेस नेत्यांकडून ठेवण्यात आला. मात्र, आज झालेली घडामोड पाहता मुळक समर्थकांना कंठ फुटला. मुळक यांच्या विरोधात काही काँग्रेस नेत्यांनी भाजपशी पडद्यामागे हात मिळवणी केली होती. याचा वेळीच अंदाज आल्यामुळेच मुळक लढले नाहीत. ग्रामीणमधील काँग्रेस नेत्याने भाजप नेत्यांशी घेतलेल्या गुप्त भेटीनंतर हे स्पष्ट होते, असे काँग्रेसच्या माघारीनंतर मुळक समर्थक छाती ठोकून सांगत होते. मतदारांच्या पदरीही ‘दुष्काळ’४विधान परिषदेची निवडणूक म्हटले की मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो. बहुतांश मतदारांना तर या निवडणुकीचे डोहाळे लागतात. कुणी गाडी खरेदीचे, फॉरेन टूरचे तर कुणी स्वत:च्या निवडणुकीच्या खर्चाची तरतूद करण्याचे स्वप्न रंगवतात. या वेळी भाजपने गिरीश व्यास व काँग्रेसने फारसे परिचित नसलेले अशोकसिंग चव्हाण यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे मतदारांचे भाव आधीच पडले होते. मात्र, निवडणूक झाली तर फुल ना फुलाची पाकळी वाट्याला येईल, अशी अनेकांना आशा होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसने उमेदवारी मागे घेतल्याने आशा लावून बसलेल्या मतदारांची पुरती निराशा झाली आहे. राज्यात दुष्काळ आहे, पण आता खऱ्या अर्थाने आपल्यालाही ‘दुष्काळा’चे चटके सहन करावे लागतील, अशी चर्चा मतदार नगरसेवकांमध्ये रंगली होती.
‘माघारी’ने काँग्रेसमध्ये नाराजी
By admin | Updated: December 13, 2015 02:50 IST