जगदीश जोशी नागपूर लठ्ठ पगाराचे आमिष देऊन अंगोला देशात पाठविण्यात आलेल्या शहरातील चार तरुणांना ‘वेठबिगार’सारखे काम करवून त्रास दिला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पीडित तरुणांचे कुटुंबीय कळमना पोलीस ठाण्याचा चकरा मारत आहेत. ठाण्यातून कुठलीही मदत मिळाली नसल्याने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेही दाद मागितली आहे. कळमना येथील कोमलचंद झरपुरे, चेतन गडरिये, प्रदीप जोसेफ आणि त्यांचा एक साथीदार नागपुरात दुचाकी शोरूममध्ये मेकॅनिकचे काम करीत होते. झरपुरे तीन वर्षांपूर्वी तर इतर तिघे जानेवारी २०१४ मध्ये आकाश सतेजा याच्या संपर्कात आले. वर्धमाननगर येथे सतेजाची ‘प्लेसमेंट एजन्सी’ आहे. सतेजाने मोटारसायकल कंपनीचा एजंट असल्याची आपली ओळख करून दिली होती. अंगोलात दुचाकी मेकॅनिकचा खूप तुटवडा असल्याचे सांगून त्याने तिघांनाही चलण्याचा प्रस्ताव दिला होता. दर महिन्याला ६० ते ७० हजार रुपये पगार मिळेल, असेही सांगितले होते. सोबतच पासपोर्ट आणि इतर खर्च तो स्वत: करायला तयार होता. एका वर्षाचा करार राहील. त्यानंतर ते कधीही परत येऊ शकतात, असेही सांगितले होते. विदेशात जाऊन दोन ते तीन वर्षात श्रीमंत झालेल्या लोकांची नावेही त्याने सांगितली होती. अधिक वेतन मिळत असल्याने चौघेही तेथे जाण्यासाठी तयार झाले. झरपुरे मे २०११ मध्ये तर इतर तिघांना २३ फेब्रुवारी २०१४ मध्ये अंगोला येथे दुचाकी कंपनीच्या वर्कशॉपमध्ये कामासाठी पाठविण्यात आले. वर्कशॉपपासून खूप दूर एका कॉम्प्लेक्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. काही दिवसानंतरच झरपुरेला २५ हजार रुपये वेतन देण्यात येऊ लागले. ते सुद्धा तीन-चार महिन्यानंतर दिले जात होते. कुठल्याही बाहेरच्या व्यक्तीसोबत त्यांचा संपर्क येऊ नये म्हणून त्यांना डांबून ठेवले जाऊ लागले. ते जिथे राहत होते, तिथे बाहेरुन कुलूप लावले जात होते. कमी वेतन आणि जास्तीतजास्त काम तसेच वेठबिगारासारखी वागणूक मिळत असल्याचे झरपुरे याने आपल्या कुटुंबीयांना सांगितले. तसेच येथून आपली सुटका करा, अशी विनवणीसुद्धा केली. तेव्हापासून झरपुरेची पत्नी त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करू लागली. यादरम्यान इतर तिघांचे कुटुंबीय सुद्धा आपापल्या मुलांच्या सुटकेसाठी प्रयत्न करू लागले. सतेजाने सुरुवातीला झरपुरेच्या कुटुंबीयांना आश्वासन देऊन परत पाठविले.हीच पद्धत त्याने इतर तिघांच्या कुटुंबीयांसाठी वापरली. झरपुरेच्या पत्नीने दीड महिन्यांपूर्वी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सतेजा याला विचारपूस करण्यासाठी ठाण्यात बोलावले. झरपुरे याला महिनाभरात परत आणून देण्याचे आश्वासन सतेजाने दिले. पोलिसांनी ज्योतीला आणखी महिनाभर वाट पाहण्याचा सल्ला दिला. महिनाभराची वेळ निघून गेल्यावर ज्योती आणि इतर कुटुंबीय पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत. परंतु आता पोलिसांचा व्यवहार बदलला आहे. ते सहकार्य करण्याऐवजी पीडित कुटुंबीयांनाच फटकारत आहेत. त्यामुळे पीडित कुटुंबीयांनी डीसीपी अभिनाश कुमार यांच्याकडे दाद मागितली. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. सतेजा याच्याशी फोनवर संपर्क केला असता त्याचा कर्मचारी साजीदशी बोलणे झाले. त्याने सांगितले की, या प्रकरणासाठीच ते अंगोले येथे गेले आहेत. आठवडाभरात ते परत येण्याची शक्यता आहे. झरपुरेने सांगितली आपबिती तीन वर्षांपासून वेठबिगाराचे जीणे जगत असलेले झरपुरे यांनी अंगोला येथून लोकमतजवळ आपबिती सांगितली. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध केल्यामुळे एका भारतीय व्यक्तीला चोरीच्या खोट्या प्रकरणात फसविण्यात आले. त्याची सुटका आता कठीण झाली आहे. माझ्या कुटुंबीयांनी नागपुरात तक्रार केल्यापासून मला धमकावले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. दीड महिन्यांपूर्वी परतला पारडी येथील शिशुपाल ४ एप्रिल रोजी अंगोला येथून घरी परतला आहे. पत्नीने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शिशुपालला तेथून घरी पाठविण्यात आले. सुरुवातीला सतेजा याने झरपुरे व इतर साथीदारांना परत पाठविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याच्या गोष्टीवर कुटुंबीयांना विश्वास राहिलेला नाही.
लठ्ठ पगाराच्या आमिषात बनले अंगोलात वेठबिगार
By admin | Updated: May 25, 2015 03:02 IST