कैलाश खेर यांच्या गीतांची रंगत : कैलाश यांनी विजय दर्डा यांचे केले मंचावरून स्वागत नागपूर : नागपूरच्या संत्र्यासोबतच स्वातंत्र्य संग्राम सेनानी, कलावंत, उद्योगपती यांचीही नगरी नागपूर आहे, असे मत व्यक्त करीत सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी शनिवारी तिरपुडे कॉलेज मैदानात एकापेक्षा एक लोकप्रिय गीते सादर करून नागपूरकर रसिकांना जिंकले. ‘मोहे पिया मिलन की आस..’ ते ‘अल्लाह के बंदे...’ पर्यंतचा हा प्रवास नागपूरकरांना आनंद देणारा ठरला. नागपूरकर रसिकांविषयीचे प्रेम करताना त्यांनी ‘मै तो तेरे प्यार मे दिवाना हो गया...’ हे गीत सादर केले आणि रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देत कैलाश यांना प्रतिसाद दिला. महाराष्ट्र टाइम्सच्यावतीने कैलाश खेर नाईट या कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन करण्यात आले. अनेक लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करून त्यांने रसिकांना जिंकले. मंचावर येताच रसिकांना अभिवादन करून कैलाश यांनी ‘जोगी मेरा रंग रंगीला..., नी मै जाणा...’ या गीताने रसिकांची दाद घेतली. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांचे कैलाश खेर यांनी मंचावरूनच अभिवादन करून स्वागत केले. यावेळी कैलाश म्हणाले, नागपुरात येतो तेव्हा येथे लहान भारताचेच दर्शन होते. नागपूर, पुणे, इंदोर येथे जो गायक यशस्वी होतो तोच खरा गायक असतो. येथील संत्रे आणि रसिक दोन्हीही उत्साह वाढवितात. कैलाशा ग्रुपची स्थापना २००४ साली करण्यात आली. यानंतर त्यांनी गीतांची एक मालिकाच सादर केली. ‘ओ पिया, ओ पिया..., रंग दिनी रंग दिवी..., तेरे बिना नही लगता दिल मेरा ढोलना..., प्रीत की लत ऐसी लागी हो गई रे मै मतवाली..., केसे बताएं कि तुझको चाहूं...’ आदी गीतांनी त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी त्यांनी काही मुलींना रंगमंचावर बोलावून नृत्य करण्याचेही आवाहन केले. याप्रसंगी काही युवतींनी ‘जोगन चली गए...’ या गीतावर तुफान नृत्य केले. पंजाबी तडका देत त्यांनी ‘पंजाबिया डा ढोल बजदा...’ हे गीत सादर केले. यावेळी कैलाश ग्रुपच्या सदस्यांनी तबला. ढोल आणि ड्रम्सची अनोखी जुगलबंदी सादर केली. काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर कैलाश यांनी ‘तौबा तौबा रे..., या रब्बा दे दे काई जान भी अगर...,’ आदी गीते सादर केली. कार्यक्रमात महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित यांनी प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सर्व उपस्थित अतिथींचे स्वागत केले. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त अनूपकुमार, पोलीस आयुक्त के. के. पाठक, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, संयुक्त आयुक्त अनुपकुमार सिंह, विशेष पोलीस महानिरिक्षक रवींद्र कदम, सीबीआयचे सुपरिटेंडेट संदीप तामगाडगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
‘मै तो तेरे प्यार मे दिवाना हो गया...’
By admin | Updated: February 8, 2015 01:14 IST