गणेशपेठ पोलीस ठाण्यात बँक कॅशियरविरुद्ध गुन्हा दाखल नागपूर : जास्त रक्कम भरूनही बँक कॅशियरने कमी रकमेची पावती दिल्याचा प्रकार महाल येथील एका बँकेत उघडकीस आला. ग्राहकाच्या तक्रारीवरून बँक कॅशियरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश वनवे (२८) रा. गणेशपेठ असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. वनवे याच्यानुसार तो शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाल येथील सहकारी बँकेत रोख रक्कम जमा करण्यासाठी गेला. त्यांनी १ लाख ८ हजार रुपयाची रोख रक्कम बँकेत भरली. १००० रुपयाच्या ५३ आणि ५०० रुपयाच्या ११० नोटा बँक स्लीपमध्ये भरून कॅश काऊंटर क्रमांक १ च्या कॅशियरला दिल्या. परंतु कॅशियरने तांत्रिक कारण सांगून केवळ ९२ हजार रुपयाची पावती भरून देण्यास सांगितले. यानंतर वनवे यांनी ९२ हजार रुपयाची पावती भरून दिली, मात्र उर्वरित १६ हजार रुपये कॅशियरने परत केले नाही. वनवेने ९२ हजार रुपयेच जमा केल्याचा दावा कॅशियरने केला. यानंतर वने बँकेच्या व्यवस्थापकांना भेटला आणि घडलेला प्रकार सांगितला. व्यवस्थापकाने हिशेब केल्यानंतर अधिक रक्कम आढळून आल्यास परत करण्याचे आश्वासन दिले. परंतु सायंकाळी हिशेब केल्यावरही त्याची रक्कम परत करण्यात आली नाही. अखेर वनवेने गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (प्रतिनिधी)
जास्त रक्कम घेऊन कमी किमतीची पावती
By admin | Updated: November 12, 2016 03:13 IST